पणजी : कर्नाटक विधानसभा निवडणूक निकाल तसेच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी नुकतेच गोवा दौºयात विधानसभेच्या पुढील निवडणुकीत ४0 पैकी ३५ पेक्षा जास्त जागा जिंकण्याचे जे लक्ष्य भाजप कार्यकर्त्यांसमोर ठेवले त्या पार्श्वभूमीवर भाजप आघाडी सरकारात घटक असलेले मगोप आणि गोवा फॉरवर्डने ‘राजकारणात कोणीही प्रादेशिक पक्षांना कमी लेखून चालणार नाही’, असे म्हटले आहे. गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष तथा नगरनियोजनमंत्री विजय सरदेसाई म्हणाले की, कर्नाटकात काँग्रेसला सरकार स्थापन करण्यासाठी प्रादेशिक पक्षाची मदत घ्यावी लागली त्यामुळे अशा पक्षांचे महत्त्व अधोरेखित होते. दुसरीकडे अमित शहा यांनी रविवारी जे कार्यकर्ता संमेलन घेतले ते त्यांनी भाजप कार्यकर्त्यांनी लोकसभा निवडणुकीसाठी तयारीला लागावे यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी होते. या संमेलनात ते काय बोलले यावर मला भाष्य करायचे नाही. परंतु प्रादेशिक पक्षांकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही, हेही तितके च खरे होय, असे प्रतिपादन सरदेसाई यांनी केले. मगोपचेही १८ जागांचे लक्ष्य मगोपचे अध्यक्ष दीपक ढवळीकर म्हणाले की, ‘शहा यांचे पुढील विधानसभा निवडणुकीत ३५ जागा जिंकण्याचे जसे स्वप्न आहे तसेच मगोपचेही किमान १८ जागा जिंकण्याचे तसेच मराठीला राजभाषेचा दर्जा देण्याचे स्वप्न आहे. स्वप्न साकार करण्यासाठी प्रत्येक पक्षाने काम करावे परंतु एक मात्र विसरु नये की, गोव्याच्या राजकारणात प्रादेशिक पक्षांना नेहमीच महत्त्व प्राप्त झाले आहे. प्रादेशिक पक्षांनी येथे वेळोवेळी चांगली कामगिरी बजावली आहे. राज्यात आठ ते नऊ जागा अशा आहेत की त्या नेहमीच प्रादेशिक पक्षांकडेच राहणार आहेत.’ कर्नाटकच्या निकालांबाबत ढवळीकर म्हणाले की, ‘कुठलाच राजकीय पक्ष प्रादेशिक पक्षांना कमी लेखू शकत नाही, हे स्पष्ट झाले आहे. कर्नाटक विधानसभेत सर्वात मोठा पक्ष ठरल्याबद्दल आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन करतो,’
प्रादेशिक पक्षांना कमी लेखू नका, गोव्यात आघाडी सरकारमधील घटक पक्ष गोवा फॉरवर्ड, मगोपचे प्रतिपादन
By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2018 1:16 PM