लोकमत न्यूज नेटवर्क, फोंडा : रिझर्व्ह बँकेने १९ मे रोजी एक परिपत्रक जारी करून दोन हजाराची नोट चालनातून परत घेण्यात येणार असल्याचे जाहीर केले. व या नोटा ३० सप्टेंबर पर्यंत सर्व ठिकाणी चालनात राहतील असा स्पष्ट निर्देश आरबीआयने दिला आहे.
असे असतानाही अनेक ठिकाणी बाजारात किंवा छोट्या मोठ्या विक्रेत्यांकडे, मासळी विक्रेत्यांकडे दोन हजाराच्या नोटा स्वीकारण्यात नकार दिला जातो, असे प्रकार घडत आहेत. ज्या लोकांना आरबीआयने दिलेल्या निर्देश माहीत नाही अशा लोकांकडून दोन हजाराची नोट घेण्यात साफ विरोध दर्शवतात. काही लोकांना दोन हजाराच्या नोटांबाबत गैरसमज झाल्यामुळे ही स्वीकारण्यात कटकट करतात.
२,०००ची नोट ३० सप्टेंबरपर्यंत चलनात
रिझर्व बँकेने जाहीर केलेल्या निर्देशनानुसार दोन हजाराची नोट ३० सप्टेंबरपर्यंत चालत राहणार असे जाहीर केले आहे. याचप्रमाणे २३ मेपासून कोणत्याही बँक मध्ये दोन हजाराच्या नोटा जमा कराव्यात किंवा बदलून घ्यावी याचीही प्रक्रिया सुरू केली आहे. याबाबत लोकांनी बदलून घेण्यासाठी गडबड किंवा गर्दी करू नये याकरता ३० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ दिलेली आहे.
इथे का स्वीकारली जात नाही दोन हजारांची नोट?
बाजारात छोटे भाजी विक्रेते, गाडेवाले, मासळी विक्रेते
बाजारातील काही छोट्या व्यापारी विक्रेत्यामध्ये दोन हजार नोटा बंद झाल्या हा गैरसमज निर्माण झाल्यामुळे अनेक छोटे विक्रेते ही नोट स्वीकारण्यास नकार देतात. याचप्रमाणे काही विक्रेते दोन हजाराची नोट घेतल्यानंतर ग्राहकाला पाहिजे तेवढी शिल्लक चिल्लर रक्कम देणे शक्य होत नसल्यामुळे नोटा घेण्यात टाळाटाळ करतात. काही मासे विक्रेते दोन हजाराची नोट पुढे केल्यानंतर, 'ही नोट नको तर दुसरी द्या' असे सांगतात.
दुकानदारही नोट स्वीकारेनात
फोंड्यात काही छोट्या दुकानात खरेदी केल्यानंतर दोन हजाराची नोट दिल्यास नकार देतात. मात्र काही मोठे व्यापारी, हॉटेलवाले, किराणा दुकानदार ज्यांना रिझर्व्ह बँकेने काढलेल्या निर्देशाची माहिती असल्यामुळे दोन हजाराची नोट स्वीकारतात व बँकेमध्ये जमा करतात. यामुळे त्यांच्या व्यवहारावरही कोणताच परिणाम होत नाही.
पेट्रोल पंपावर चालते ही नोट
अनेक ठिकाणी दोन हजाराची नोट स्वीकारली जात नसल्याची अफवा पसरल्यामुळे काही लोकांनी आपल्याकडे असलेल्या दोन हजाराच्या नोटा बँकांमध्ये जाऊन बदलून घेतल्या. पेट्रोल पंपावर ही नोट स्वीकारत असल्यामुळे काही ग्राहकांनी पेट्रोल पंपवर दोन हजाराची नोट देऊन पेट्रोल घालूनही पैसेही बदलून घेत आहेत. पंपचे मालक नोट स्वीकारतात, खात्यामध्ये जमा करून घेतात, असे एका पेट्रोल पंपच्या मालकांनी सांगितले.