लोकमत न्यूज नेटवर्क पणजी/फोंडा/मडगाव : साकवाळ पाठोपाठ प्रियोळमधील कुंकल्ये व सासष्टीत बेतालभाटी ग्रामस्थांनीही तिथे येऊ घातलेल्या मेगा प्रकल्पांविरोधात रणशिंग फुकले आहे. हे प्रकल्प रद्द न झाल्यास आंदोलन चिघळण्याची शक्यता आहे. सांकवाळ येथे डोंगरफोड तसेच वृक्षतोड करुन मोठ्या प्रमाणात पर्यावरणाची हानी करुन येऊ घातलेल्या मेगा प्रकल्पाविरोधात आंदोलन तापले होते, त्यात आता या दोन मेगा प्रकल्पांच्या चाबतीत स्थानिकांनी केलेल्या उठावाची भर पडली असून काँग्रेसने कुंकळ्ळ्येवासीयांच्या आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला आहे.
कुंकळ्ये-म्हार्दोळ येथील बालाजी मंदिरापासून जवळपास असलेल्या ठिकाणी एका बिल्डरकडून प्लॉट्स पाडण्यात आलेले असून या प्रकल्पाला ग्रामस्थांनी तीव्र विरोध केला आहे. बाहेरील लोकांनी येथील प्लॉट विकत घेऊन स्वतःचे आर्थिक नुकसान करून घेऊ नये, असे आवाहन ग्रामस्थांनी केले आहे. येथील केळबाय मंदिराच्या प्रांगणात रविवारी ग्रामस्थांनी पत्रकार परिषद घेऊन सदर माहिती दिली. सरपंच हर्षा गावडे यांनी यावेळी लोकांना पाठिंबा दर्शविला.
आमचा गाव हा हिरवाईने नटलेला आहे. लोक गुण्यागोविंदाने येथे नांदत आहेत. प्लॉट घेण्यासाठी बाहेरून आणखी लोक आल्यास गावाचा समतोल बिघडेल. आताच येथे पाण्याची व विजेच्या समस्या आहेत. आणखी लोकसंख्या वाढल्यास गावकऱ्यांना पाण्याचा तुटवडा सोसावा लागेल. ग्रामपंचायत वतीने सदर प्रकल्पाला कोणताच परवाना देण्यात आलेला नाही. असे असतानाही एक व्यक्ती येथे प्लॉट्स विकसित करत आहे ते चुकीचे आहे. प्रकल्पामुळे या गावाची शांतता बिघडेल. त्यामुळे नगर नियोजन खात्याने येथील जमिनीचे रूपांतर करू नये. सदर प्लॉट्स घेऊन लोकांनी घरे बांधून नयेत, असे आवाहनही ग्रामस्थांनी केले आहे. कारण, ही जमीन ऑर्चड विभागात मोडत असून विरोध असतानाही इथे घरे बांधली गेली तर पंचायतीच्या माध्यमातून त्यांना घर क्रमांक, वीज जोडणी, पाण्याच्या जोडण्या देण्यात येणार नाहीत.
पंचायत सदस्य रंगनाथ गावडे म्हणाले की, या दिवसात गावाबाहेरील काही व्यक्ती इथे येऊन प्लॉट बघत असल्याने प्लॉट्स निर्माण केल्याचा संशय आम्हाला आला. आम्ही यासंबंधी ग्रामस्थांमध्ये जागृती केली. त्यावेळी समस्त लोकांचा याला तीव्र विरोध असल्याचे जाणवले. आमच्या गावात लोकांना जे हवे तेच होणार. लोकांचा विरोध पत्करून येथे कोणीच कसले प्रकल्प आणू नयेत. कुणीही इथे शेतीसाठी जमीन विकत घ्यावी व शेतीसाठी विकसित करावी आम्ही त्याला विरोध करणार नाही.
गावावर बोजा नको
कुंकळ्ये येथील शेतकरी संघटनेचे अध्यक्ष संजीव कुंकल्येकर म्हणाले की, आमच्या गावाला अगोदरच काही नैसर्गिक मर्यादा आहेत. अशातच बाहेरून आलेल्या लोकांमुळे येथील लोकसंख्या वाढेल. हा गाव कृषी क्षेत्रावर अवलंबून आहे. प्रकल्पामुळे तिथली वनराई नष्ट होईल. कुंडई औद्योगिक वसाहतीमुळे अगोदरच आमच्या गावाचा हास झालेला आहे. गाय प्रदूषणाच्या विळख्यात पडलेला आहे. आता आमच्या गावावर अतिरिक्त संकट नको.
कोणत्याही लढाईस तयार
दुर्गादास गावडे म्हणाले की, इथली जमीन घेऊन लोकांनी त्रासात पडू नये म्हणून आमच्या लोकांनी मुख्य रस्त्यावर धोक्याची सूचना देणारे फलक लावलेले आहेत. येथे गुंतवणूक करून पाहणाऱ्या लोकांनी आताच सावध व्हावे. जो कोणी हा प्रकल्प येथे आणू पाहतो त्याने कायदेशीर लडाईच्या भानगडीत करून पडू नये. कारण लोक कोणत्याही परिस्थितीत हा प्रकल्प येथे येऊ देणार नाहीत.
गावांवर ताण देऊ नका
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी कुंकव्येवासीयांच्या आंदोलनाला पाठिबा जाहीर करताना एकजूट दाखवल्याबद्दल अभिनंदन केले आहे. पाटकर म्हणाले की, पाणी व विजेची समस्या निर्माण करणारे तसेच शेतजमिनीचा नाश करणारे प्रकल्प आम्हाला नकोच. मेगा प्रकल्पांमुळे गोव्याची परंपरा, वारसा व संस्कृतीवर परिणाम होतो. गावातील लोकसंख्या वाढते व साधनसुविधांवरही ताण येतो. कुंकल्येवासीयांनी मेगा प्रकल्पाला विरोध दर्शवल्याने ते कौतुकास पात्र आहेत.