कोंकणी अकादमीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून अध्यक्ष नको; काँग्रेसची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2023 10:22 AM2023-06-18T10:22:10+5:302023-06-18T10:23:31+5:30
संस्थेला कायमस्वरूपी जागा देण्याची मागणी
लोकमत न्यूज नेटवर्क पणजी : कोकणी अकादमीवर राजकारण सुरू झाले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून अध्यक्ष नेमण्याच्या हालचाली सुरू आहेत. मात्र, अकादमीवर असा अध्यक्ष नेमू नये' अशी मागणी काँग्रेस पक्षाचे नेते अमरनाथ पणजीकर यांनी पणजीत पत्रकार परिषदेत केली.
भाजप सरकार कोकणी लेखकांची फसवणूक करीत आहे. नवोदित लेखकांना योजनांचा लाभ मिळण्यापासून वंचित ठेवले जात आहे' असा आरोपही त्यांनी केला. पणजीकर म्हणाले, गोवा कोकणी अकादमीसाठी सरकारने कायमस्वरूपी जागा उपलब्ध करून द्यावी. अकादमीसाठी नवा अध्यक्ष नेमावा. कोकणी भाषेच्या प्रगतीसाठी आणि तिच्या विकासासाठी काँग्रेसचे खूप योगदान आहे.
दिवंगत माजी खासदार शांताराम नाईक यांनी अकादमीला भाषा प्रसारासाठी मोबाइल व्हॅन लायब्ररी दान केली होती. पण सरकारला ते वाचनालय सांभाळण्यात आणि राज्याच्या कोनाकोपऱ्यात पोहोचविण्यात अपयश आले. खरेतर अकादमीच्या कामाला गती देण्याची गरज होती. भाषा प्रसाराचे काम गतीने व्हायला हवे होते. यासाठी सरकारने अकादमीला कायमस्वरूपी जागा द्यावी. जर सरकार कार्यालय एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हलवत राहिले तर त्याचा प्रगतीवर परिणाम होईल. सरकारने याची दखल घेण्याची गरज आहे. यावेळी विल्मा फर्नाडिस, केनिशा मिनेंझिस व महेश नादार उपस्थित होते.
अकादमी पाच महिने अध्यक्षांविना
कोकणी भवन बांधून त्या इमारतीत अकादमीला स्थान द्यावे. म्हणजे लेखकांना योजनांचा लाभ घेता येईल, साहित्यिक कार्याला चालना मिळेल. अकादमीच्या अध्यक्षपदी अरुण साखरदांडे यांचा कार्यकाळ जानेवारीत संपला तरी नवीन अध्यक्षांची नियुक्ती झालेली नाही. अकादमीने साहित्य पुरस्कार देणे पुन्हा सुरु केले पाहिजे, अशी मागणीही पणजीकर यांनी केली.