लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : सनबर्नच्या प्रश्नावर मंत्री माविन गुदिन्हो, अपक्ष आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स व आंतोन वास यांनी मुख्यमंत्र्यांची स्वतंत्रपणे भेट घेऊन दक्षिण गोव्यात या ईडीएमला परवानगी देऊ नका, अशी आग्रही मागणी केली आहे. मुख्यमंत्र्यांनी मागणीची दखल घेऊन दक्षिणेत सनबर्न होणार नसल्याचे आश्वासन दिल्याचे रेजिनाल्ड यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
दक्षिण गोव्यात सननबर्नला परवानगी न देण्याचा निर्णय सरकारने तत्वतः घेतला आहे. आम्ही कोणताही गाजावाजा न करता मुख्यमंत्र्यांना भेटलो व दक्षिण गोव्यातील लोकांचा या ईडीएमसाठी असलेला विरोध त्यांच्या लक्षात आणून दिला त्यावर मुख्यमंत्र्यांनी आम्हाला दक्षिणेत तो होणार नाही, असे आवस्थ केल्याचे रेजिनाल्ड म्हणाले.
सत्तेत असल्याने लोकांच्या भावना सरकारपर्यंत पोहोचवणे माझे कर्तव्य आहे. आम्ही रस्त्यावर उतरुन आवाज केला नाही. पण, तिघेजण स्वतंत्रपणे मुख्यमंत्र्यांना भेटलो. आम्हाला सनबर्न नको, हे त्यांना सांगितले. काही लोक मला टार्गेट करत आहेत. दिगंबर कामत मुख्यमंत्री असताना प्रोत्साहन दिल्याचे आरोप होत आहे.
याआधी मी कधीही सनबर्नच्या आयोजकांना भेटलो नव्हतो. परंतु हा ईडीएम आता दक्षिण गोव्यात येऊ घातल्याचे वृत्त पसरल्याने मी आयोजकांचीही भेट घेतली व त्यांना दक्षिण गोव्यात येऊ नका, असे सांगितले. सनबर्नसाठी मी कधीही आयोजकांकडून पास घेतले नाहीत. किंवा साधा एक कप चहाही घेतला नाही, असेही ते म्हणाले.
सनबर्नविरोधात दक्षिण गोव्यात अनेक पंचायतींच्या ग्रामसभांमध्ये तीव्र विरोध झालेला आहे. सनबर्न नकोच, असे ठराव घेण्यात आलेले आहेत. दक्षिण गोव्यातील सत्ताधारी आमदारांनीही तो दक्षिणेत झालेला नकोय.
दरम्यान, गोव्यात नववर्ष स्वागतासाठी येणाऱ्या देश विदेशी पर्यटकांमध्ये हा ईडीएम आकर्षणाचा ठरला आहे. फेस्टिव- लमध्ये होणाऱ्या ड्रग्स सेवनामुळे तो नेहमीच वादाच्या भोवऱ्यात राहिलेला आहे. यापूर्वी या फेस्टि- वलमध्ये ड्रग्स सेवनाने मृत्यू होण्याचे प्रकारही घडलेले आहेत. आजपर्यंत हा ईडीएम वागातोर येथे किनारी भागात होत असे व त्यामुळे वाहतुकीची मोठी कोंडी व्हायची, त्यामुळे स्थानिकांचाही विरोध होता. यंदा तो दक्षिण गोव्यात हलवण्याचा निर्णय आयोजकांनी घेतला.
लोकभावना मांडल्या
औद्योगिक विकास महामंडळाच्या माध्यमातून सनबर्नला कोणतेही सहकार्य दिलेले नाही. माझ्या मतदारसंघाचा विकास करण्यासाठीच मी भाजप सरकारला पाठिंबा दिलेला आहे. गोवेकरांचे हित हे माझ्यासाठी प्राधान्य आहे, त्यामुळे कोणत्याही विषयावर लोकांच्या ज्या भावना आहेत त्या सरकारपर्यंत पोहोचवणे माझे कर्तव्य आहे. सनबर्नला दक्षिण गोव्यात कुठेही परवानगी न देण्याचा तत्वतः निर्णय सरकारने घेतलेला आहे, अशी माहिती आमदार रेजिनाल्ड यांनी दिली.