लोकमत न्यूज नेटवर्क, मडगाव : सां जुझे आरियल येथे उभारण्यात आलेला शिवरायांचा पुतळा अधिकृत आहे. मात्र, शिवजयंतीदिनी घडलेला प्रकार निंदनीय असून २० हल्लेखोरांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मात्र, आता हे गुन्हे मागे घेण्यासाठी सरकारवर दबाव आणला जात असून सरकारने ते मागे घेऊ नयेत, अशी मागणी शिवप्रेमी आनंद तांडेल यांनी केले.
काल पत्रकार परिषदेत ते बोलत होते. त्यांच्यासोबत पुतळा ज्यांच्या जमिनीत कायदेशीरपणे उभारण्यात आला आहे ते जमीन मालक मेहबूब मकानदार, दीपक कट्टमणी व इतर शिवप्रेमी उपस्थित होते. मंत्री फळदेसाईवर जो हल्ला झाला तो पूर्वनियोजित होता. कारण ज्यावेळी माती व दगड त्यांच्यावर फेकण्यात आले त्यावेळी जो व्हिडियो व्हायरल झाला त्यात फ्रेडी त्रावासो हे हात उंचावून जमावाला सिग्नल देत असल्याचे दिसून येते. आमदार क्रूझ सिल्वा व फ्रेडी त्रावासो या दोघांनी मिळून स्थानिकांना भडकवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही शिवप्रेमींनी केला.
गोवा फॉरवर्ड पक्षाचे फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई यांचे फ्रेडी त्रावासो हे कार्यकर्ते आहेत. लोकसभा निवडणूक जवळ आल्याने आमदार सरदेसाई व आमदार क्रूझ सिल्वा यांनी मिलीभगत करून लोकांना भडकवण्याचा प्रयत्न केला, असा आरोप तांडेल यांनी केला.
राजकारण्यांनी आपल्या फायद्यासाठी लोकांचा वापर केला, असाही दावा त्यांनी केला. डोंगरावर किल्ल्याची प्रतिकृती बांधायची होती. त्यासाठी २७ डिसेंबर २०२३ रोजी उपजिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज केला होता, त्याठिकाणी असलेली दोन आंब्याची झाडे कापायची होती. जर ती झाडे कापली असती तर रस्त्यावरून शिवाजी महाराजांचा पुतळा लोकांना दिसला असता, असे तांडेल यांनी सांगितले. अजूनही काही जणांवर गुन्हे नोंद करण्यासाठी पोलिस निरीक्षकांना नावे नोंद करण्यास सांगण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
सिल्वांचे समाधान नाही: जमीन मालक
जमीन मालक मेहबूब मकानदार म्हणाले, आपण आमदार कूझ सिल्वा यांना सर्व ती आवश्यक कागदपत्रे दाखवली. मात्र, एवढे करूनही त्यांचे समाधान झाले नाही. आपल्या जमिनीत स्थानिकांनी खुरीस बांधला असून त्यावर पक्के छत घातले आहे. त्यासाठी आपल्याकडून परवानगी घेतली नाही तरीही आपण गप्प राहिलो मात्र, आपल्या जमिनीत आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला तर या लोकांनी का विरोध केला?
मुख्यमंत्र्यांना साकडे
सां जुझे आरियलच्या प्रश्नावर वेळळीचे आमदार कुझ सिल्वा यांनी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची भेट घेतली. याप्रकरणी दाखल करण्यात आलेले २० जणांविरुध्दचे गुन्हे मागे घ्यावेत, अशी मागणी त्यांनी केली. तसे निवेदन मुख्यमंत्र्यांना सादर केले आहे. १८ व १९ रोजी सां जुझे आरियल येथे काय घडले याची कल्पना मी मुख्यमंत्र्यांना दिली आहे. भविष्यातही तेथे तणाव निर्माण होऊ शकतो. मुख्यमंत्र्यांनीही स्वतः अहवाल मागवून घेतलेला आहे. ग्रामस्थांना शांतता हवी आहे.