लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : तिसऱ्या जिल्ह्याविषयी आता निर्णय घेण्याची वेळ आलेली आहे. एसटी समाजाची लोकसंख्या असलेल्या काणकोण, केपे, सांगे, धारबांदोडा तालुके मिळून तिसरा जिल्हा करण्यात यावा, असे मत सभापती रमेश तवडकर यांनी बुधवारी (दि. २४) व्यक्त केले.
तिसऱ्या जिल्ह्याच्या निर्मितीची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. या विषयावर बोलताना सभापती तवडकर म्हणाले की, काणकोण, सांगे, केपे, धारबांदोडा हे तालुके तसे अंतर्गत आहेत. शिवाय एसटी समाजाचे लक्षणीय प्रमाण असलेले आहेत. या तिन्ही तालुक्यांना मिळवून तिसऱ्या जिल्ह्याची निर्मिती केली तर ते विकासाच्या दृष्टीने चांगले होईल. या तिन्ही तालुक्यांचा तिसरा जिल्हा झाल्यास केपे तालुका हे मध्यवर्ती ठिकाण बनवावे, असेही तवडकर यांनी सांगितले.
आमदार नीलेश काब्राल यांनीही तिसऱ्या जिल्ह्याची गरज व्यक्त केली आहे. केपे मध्यवर्ती ठिकाणा बनविण्याची त्यांचीही मागणी आहे. कुडचडे, सांगे, धारबांदोडा येथील लोकांना आपल्या सरकारी कामांसाठी मडगावला जावे लागत आहे. हे त्यांच्यासाठी खूपच त्रासदायक आणि वेळकाढू ठरत आहे. त्यामुळे तिसरा जिल्हा हा लोकांच्या समस्या सोडविण्यासाठी उपयुक्त मार्ग आहे. असेही काब्राल माध्यमांशी बोलताना म्हणाले.