लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : देशातील लहान राज्य अशी ओळख असलेला गोवा साक्षरतेमध्ये पुढे आहे. शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर पदवी तसेच पदव्युत्तर शिक्षणावर भर दिला जातो. राज्यातील अनेक उच्चशिक्षित केवळ गोव्यातच नव्हे, तर भारतात तसेच भारताबाहेरसुद्धा चांगल्या पदावर काम करीत आहेत; मात्र असे असूनही मागील काही वर्षात गोव्यातील बेरोजगारी प्रचंड वाढत आहे.
सरकारी सोडाच, पण खासगी नोकरीसुद्धा मिळण्यास युवकांना त्रास होत आहे. त्यामुळेच कदाचित गोव्यातील अनेक युवक पुणे, मुंबई, बंगळुरू या राज्यांमध्ये नोकरीच्या शोधात जात आहेत. पदवी मिळाली, आयटीआयही झाले, नोकरी देता का नोकरी? अशी स्थिती आहे.
बेरोजगारी १६.२ टक्के
सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी अर्थात सीएमआयईने नुकत्याच जारी केलेल्या आपल्या अहवालात गोव्याची बेरोजगारीची टक्केवारी ही १६.२ टक्के इतकी असल्याचे स्पष्ट केले आहे. देशातील बेरोजगारीच्या तुलनेत राज्यातील तुलनेत ती दुप्पट आहे. यावरून पदवी, उच्च शिक्षण असले तरी युवकांकडे नोकरी नाही, हे भयाण सत्य दिसून येत आहे. महत्त्वाचे म्हणजे नोव्हेंबर २०२२ मध्येसुद्धा ती १३.२ टक्के होती.
आश्वासने पुरेत
सरकारने नोकऱ्यांबाबत खोटी आश्वासने देऊ नयेत. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी रोजगार पुरवण्याबाबत अगोदर जबाबदारी पूर्ण करावी अशी टीका गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष तथा आमदार विजय सरदेसाई यांनी सीएमआयईच्या अहवालानंतर केली होती.
राज्यात १.२० लाखांपेक्षा अधिक नोंदणी
गोवा सरकारच्या रोजगार विनिमय केंद्रात नोकरी इच्छुक तरुण- तरुणींकडून नावनोंदणी केली जाते. या केंद्रात १.२० लाखांपेक्षा अधिक नावे नोंद आहेत. या युवकांना नोकरीच्या चांगल्या संधी मिळाव्यात, यासाठी काही महिन्यांपूर्वी सरकारच्या कामगार खात्याने रोजगार मेळावा आयोजित केला होता. यात काहींना रोजगाराची संधीही मिळाली आहे.
साक्षरतेचे प्रमाण अधिक
गोव्यात साक्षरतेचे प्रमाण ८८.७० टक्के इतके आहे. युवक तसेच युवती अभ्यास करुन चांगले करिअर घडावे यासाठी भर देत आहेत. महत्त्वाचे म्हणजे केवळ पदवी प्राप्त करण्यावर न थांबता पदव्युत्तर, उच्च शिक्षणावरही भर दिला जात आहे. त्यामुळे लहान असले तरी देशात साक्षरतेच्या बाबतीत गोवा पुढे आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"