विधानसभा अधिवेशन अठरा दिवसांचे ठेवले की, विविध विषयांवर चर्चा होते. अनेकांचे बिंग फुटते. सरकार एक्सपोज होते आणि काही मंत्र्यांचे पितळ उघडे पडते. राज्यात काय चाललेय, कोणते घटक राज्याला रसातळाला नेत आहेत, हे अधिवेशनातील चर्चेवरून कळून येते. खुद्द भाजपचे आमदार मायकल लोबो, संकल्प आमोणकर आदींनी परवा बंच केबल घोटाळा सरकारच्या नजरेस आणून दिला. आपलेच दात आणि आपलेच ओठ अशी सावंत सरकारची स्थिती झाली आहे.
पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी मंगळवारी विधानसभेत दलालांवर भाष्य केले. पर्यटकांना लुबाडणाऱ्या दलालांची गय केली जाणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. पर्यटकांना केवळ दलालच लुबाडतात असे नाही, तर काही वाहतूक पोलिसदेखील खूप लुबाडतात, हे सरकारला लक्षात ठेवावे लागेल. यापूर्वी भाजपचेच आमदार मंत्री मायकल लोबो सातत्याने याविषयी बोलले आहेत. वाहतूक पोलिस केवळ महाराष्ट्र व कर्नाटकातील गाड्या थांबवून किंवा पर्यटकांना अडवून तालांव देण्याच्या नावाखाली त्यांचा छळच करतात. गोव्याला दक्षिणेची काशी करू, अशी भाषा मंत्री खंवटे करतात. मात्र गृहखात्याने गोव्याला खड्यात घालण्याचे ठरवले आहे, त्याविषयी काय बोलावे?
गोव्याला कसिनो जुगाराची राजधानी करून ठेवले आहे. एकदा जुगाराचा विस्तार झाला की, मग शरीरविक्रीचे धंदेही वाढू लागतात. रिव्होल्युशनरी गोवन्स पक्षाचे आ. वीरेश बोरकर यांनी मंगळवारी एक अनुभव विधानसभेत सांगितला. तो हसण्यावारी नेण्यासारखा नाही. गोवा म्हणजे शरीर सुखासाठी युवती मिळण्याचे ठिकाण, अशी प्रतिमा पर्यटकांच्या मनात ठसली, यास पोलिस खाते व काही राजकारणीही जबाबदार आहेत. राज्यकर्त्यांनी कसिनोसह अमली पदार्थ व अन्य व्यवसाय गोव्यात वाढू दिले. त्याचे परिणाम आता पर्यटनक्षेत्र भोगत आहे. मध्यंतरी लोबो यांनीच किनारी भागातील खंडणीराज उघड केले होते. सरकारने घाबरून, धावपळ करून त्या प्रकरणावर पडदा टाकला. कारण सरकारमधीलच काही जणांचे हात तेव्हा दगडाखाली अडकले होते. लोबो यांनी मधाच्या पोळ्यावर दगड मारला होता. सरकारमधील मधमाशा त्यामुळे इथे-तिथे पळू लागल्या होत्या.
खासगी क्षेत्रातील दोघा बदनाम व्यक्तींना पुढे करून हॉटेल व रेस्टॉरंट व्यावसायिकांकडून खंडणी उकळण्याचे काम कळंगुटमधून सुरू झाले होते. अर्थात त्या विषयाशी खंवटे व लोबो यांचा संबंध नव्हता. त्यांना बायपास करून काही जणांनी हा धंदा सुरू केला होता. खंडणी, कसिनो, वेश्या व्यवसाय, ड्रग्ज धंदे हे सगळे गोव्यात सध्या हातात हात घालून जोरात पुढे जात आहेत. पेडणे व बार्देश तालुक्याच्या किनारी भागांमध्ये काही टोळकी तयार झाली आहेत. किनारी भागांत पाटर्चा कुणाच्या सुरू ठेवायच्या, कुणाच्या बंद पाडायच्या, म्युझिकसाठी परवाने कसे झटपट द्यायचे हे ठराविक राजकारणी व ठराविक व्यक्ती ठरवतात. महसूल खात्यालाही याची कल्पना आहे. मंत्री बाबूश मोन्सेरात यांनादेखील हे ठाऊक असेल. सांतआंद्रेचे आ. बोरकर यांनी गोव्याचे धक्कादायक चित्र नव्याने मांडले आहे. आपली गाडी वाटेत थांबवून तुमको लडकी चाहिए क्या असे आपल्याला दलालांनी विचारले, असे वीरेश बोरकर यांनी जाहीर केले. असाच अनुभव कळंगुटचे सरपंच जोझफ सिक्वेरा यांनादेखील मागे आला होता. जोझफ मॉर्निंग वॉकला किनाऱ्यावर गेले होते. त्यावेळी तुमको लडकी चाहिए क्या, असे जोझफनादेखील विचारले गेले होते. वीरेशने तर सांगितले की त्या संदर्भातला व्हिडीओ विधानसभेच्या पटलावर ठेवण्यास तयार आहोत.
या दलालांवर कारवाई करावी ही वीरेशची मागणी रास्त आहे. संस्कृतीच्या गप्पा जगाला सांगत पणजीत मात्र कसिनोंसाठी पायघड्या अंथरणाऱ्या गोव्यातील सगळ्याच राज्यकर्त्यांनी विचार करण्याची वेळ आली आहे. देवभूमी गोव्याची भोगभूमी करण्याचे काम गेल्या पंधरा वर्षांत वेगाने झाले आहे. काँग्रेसने कसिनो आणले व भाजपने त्यांचा विस्तार केला. कसिनों में जाना है क्या? असे दलाल पर्यटकांना विचारतात. लड़की चाहिए क्या, असे खुद्द आमदारांनाच विचारू लागले आहेत. आम्ही गोमंतकीयांनी इथपर्यंत प्रगती केली आहे. तरीही भिवपाची गरज ना असे समजावे काय?