ऑनलाइन लोकमत
पणजी, दि. ०४ - दीन दयाळ आरोग्य विमा योजना खाजगी इस्पितळांसाठी खुली करण्यात आल्यामुळे गोवा वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टर मंडळीचे धाबे दणाणले असून रुग्ण गोमेकॉत न येता खाजगी इस्पितळात उपचार घेतील अशी भिती गोमेकॉतील डॉक्टरांनी व्यक्त केली आहे. परंतु साधन सुविधानी सुसज्ज अशा गोमेकॉत न जाता लोक खाजगी उपचार घेणे का पसंत करतील याचे नेमके उत्तर देण्यास त्यांनी टाळाटाळ केली. ओळखी पाळखी नसलेल्या रुग्णांना गॉमेकॉत वाली नसतो हे सत्यही ते मानायला तयार नाहीत.
गॉमेकॉच्या निवासी डॉक्टर संघटनेने (गार्ड्स) विशेष पत्रकार परिषद घेऊन सरकार ज्या स्वरूपात दीन दयाळ योजना अंमलबजावणी करू पाहत आहे त्यासाठी हरकत घेतली. विमा उतरलेल्या रुग्णांनी केवळ गोमेकॉतच उपचार घ्यावेत. खाजगी इस्पितळात ते गेल्यास त्यांना विमा मिळू नये. अन्यथा गोमेकॉत कुणीही रुग्ण फिरकणार नाहीत आणि त्यामुळे भविष्यात गोमेकॉ बंद करावी लागेल असे तर्क या डॉक्टर मंडळीनी पत्रकार परिषदेत बोलताना लढविला. तसेच सरकारने ही योजना टप्प्या टप्याने अंमलबजावणी करावी असेही त्यांनी सांगितले. यावेळी आश्विनी सरदेसाई, चरण फायदे, विकास कश्यप, रस्क तावारीस आणि कृष्णा शेट्ये हे संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
संघटनेचे अध्यक्ष अक्षय नाईक यांनी सांगितले की या योजनेच्या निर्मिती प्रक्रियेत जे गॉमेकॉच्या डॉक्टरांच्या पथकाने केलेल्या सूचना स्वीकारण्यात आल्या नाहीत. पूर्वी केवळ १७६ उपचार प्रकारांचा समावेश (प्रोसीजरस्) या योजनेक करण्यात आल्याचे सांगण्यात आले होते. परंतु प्रत्यक्षात ४४७ योजनांचा समावेश करण्यात आल्यामुळे भविष्यात गोमेकॉतून शिक्षण घेऊन डॉक्टर होऊन बाहेर पडणाºयांची संख्या कमी होईल अशी भिती त्यांनी व्यक्त केली.
दिन दयाळ स्वास्थ्य विमा योजना ही खाजगी किंवा सरकारी इस्पितळांसाठी नाही तर गोव्यातील लोकांसाठी आहे, आणि सामान्य माणसाला विम्या अंतर्गत उपचार घेण्यासाठी खाजही इस्पितळांची दारे खुले झाली तर त्याला गोमेकॉतील डॉक्टरांनी आक्षेप घेण्याचे कारण काय? या योजनेमुळे गोमेकॉसह इतर इस्पितळात निकोप स्पर्धा होऊन त्याचा फायदा सामान्य माणसाला मिळमार नाही काय ? रुग्णाना रुग्ण खाजगी इसपितळात उपचार घेणे पसंत करतील, गोमेकॉत येणार नाहीत असे खात्रीने सांगु शकता याचे कारण काय? गोमेकॉपेक्षा खाजगी इस्पितळात रुग्णांशी चांगला व्यवहार केला जातो असे तुम्हालाही वाटते काय ? या प्रश्नांवर त्यांची भंबेरी उडाली.
मुख्यमंत्र्यांकडून कान उघडणी
दीन दयाळ स्वास्थ्य योजनेतील ४४७ उपचार हे खाजगी क्षेत्राला खुले करू नका अशी मागणी करण्यासाठी गोमेकॉतील काही जेष्ठ व निवासी डॉक्टर मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांना भेटायला गेले होते. त्यांनाही या पथकाने तीच कहाणी सागितली होती. लोकांना खाजगी इस्पितळात मोफत उपचार दिल्यास गोमेकॉत लोक वळणार नाहीत वगैरे त्यांना सांगण्यात आले. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मुख्यमंत्र्यांनी अत्यंत शांतपणे त्यांना समजावले. तम्ही निच्छिंत राहा, रुग्णांची योग्य पद्धतीने काळजी घ्या. त्यांच्याशी आपुलकीने वागा. तसे केल्यास रुग्ण कुठेही जाणार नाहीत, गोमेकॉतच येतील असे मुख्यमंत्र्यांनी त्यांना सांगितल्यामुळे निराश होऊन ही मंडळी परत फिरली. तो बार फुसका ठरल्यामुळे नंतर पत्रकार परिषद घेण्याचा निर्णय घेण्यात आला. परंतु ते करताना ज्येष्ठ मंडळी पडद्यामागे राहिली आणि केवळ निवासी डॉक्टरांना बळीचा बकरा केले.