लोकमत न्यूज नेटवर्क म्हापसा: शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांच्या विविध कारनाम्यांसाठी कुप्रसिद्ध असलेल्या कोलवाळ येथील केंद्रीय कारागृहात नामवंत गुंड टारझन पार्सेकर आणि विजय कारबोटकर यांच्यात हाणामारीचा प्रकार काल, मंगळवारी दुपारी १२च्या सुमारास घडला. पार्सेकरने तपासणी करणाऱ्या डॉक्टरशी वाद घालणे आणि त्यांना कारागृहातील दवाखान्यात कोंडून घालणे हे दोघांत मारामारी होण्याचे तत्कालिक कारण ठरले.
मारामारीत सुरक्षारक्षकांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने अनर्थ टळला. दोघांतील पर्ववैमनस्यही मारामारीस कारणीभूत आहे.मंगळवारी काही कैद्यांना कारागृहातील दवाखान्यात वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आले होते. त्यावेळी हा प्रकार घडला. दवाखान्यातील टारझन पार्सेकरची तपासणी करताना डॉक्टर आणि त्याच्यात काही कारणावरून वाद झाला. यानंतर टारझनने डॉक्टरांना ताखान्यात बंद केले आणि तो बाहेर आला. डॉक्टरांची प्रतीक्षा करीत तो तेथून असलेला विजय कारबोटकर त्यावेळी तेथे होता. डॉक्टरांना खोलीत बंद केल्याच्या मुद्दयावरून त्याचा टारझनशी वाद झाला आणि या वादाचे पर्यवसान दोघांतील मारामारीत झाले.
कारबोटकर आणि साथीदार कैद्याने टारझनला मारहाण करण्यास सुरुवात केली. कैद्यांमध्ये सुरू झालेला हाणामारीचा प्रकार पाहून उपस्थित सुरक्षारक्षकांनी तिघांना रोखले. कारबोटकर आणि त्याच्या साथीदाराला तातडीने त्यांच्या बराकीत हलविण्यात आले. तर मारामारी सुरू झाल्यानंतर बिथरलेल्या टारझनने दवाखान्यात आश्रय घेतला. त्याने रागाच्या भरात दवाखान्यातील खिडकीची मोडतोड केली. सुरक्षारक्षकांनी वेळीच हस्तक्षेप केला नसता तर अनर्थ घडला असता.
अधिकाऱ्यांची कारागृहात धाव
दरम्यान, या प्रकाराने कारागृहात मोठा गोंधळ उडाला होता. या घटनेची तातडीने वरिष्ठांना माहिती देण्यात आली. कारागृहाचे महानिरीक्षक ओमवीर सिंग, अतिरिक्त महानिरीक्षक वासुदेव शेटये यांच्यासह तुरुंगाधिकारी व पोलिसांनी तेथे धाव घेतली. त्यानंतर कारागृहाच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली. यानंतर कारागृहातील परिस्थिती नियंत्रणात असल्याचे सांगण्यात आले.
अधिकृत तक्रार दाखल नाही
दरम्यान, यासंदर्भात पोलिस उपाधीक्षक जिवबा दळवी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी, कारागृहात विजय कारबोटकर आणि टारझन पार्सेकर दोघांमध्ये दवाखान्यात नेण्यात येत असताना वाद निर्माण झाल्याचे सांगितले. तातडीने दोघांनाही वेगळे करण्यात आले. मात्र, या प्रकाराबाबत रात्री उशिरापर्यंत कोलवाळ पोलिस स्थानकावर कारागृह प्रशासनाकडून अधिकृत तक्रार नोंदवण्यात आली नसल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.