मडगाव - वैदयकीय क्षेत्राला काळीमा फासणारी एक घटना गोव्यात घडली आहे. उपचारासाठी आलेल्या एका महिला रुग्णावर बलात्कार केल्याप्रकरणी पोलिसांनी आंजेलो मास्कारेन्हय़स (46) याला अटक केली. संशयित डॉक्टर दक्षिण गोव्यातील कुडतरी येथील आरोग्य केंद्रात वैदयकीय अधिकारी म्हणून कामाला आहे. याप्रकरणी मायणा-कुडतरी पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
भारतीय दंड संहितेंच्या 342, 354,376 (क, ड)कलमाखाली या संशयिताविरुध्द गुन्हा नोंद केला आहे. मायणा कुडतरीचे पोलीस निरिक्षक प्रवीणकुमार वस्त यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पुढील तपास करीत आहेत. संशयिताने अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला असता तो फेटाळून लावण्यात आला. पुढील तपासासाठी त्याला सहा दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला आपल्या पतीसमवेत पाच दिवसांपूर्वी गोव्यात आली होती. कामगार वर्गातील हे कुटुंब असून ती पाच महिन्याची गरोदर आहे. 26 जुलै रोजी सर्पदंश झाल्याने तिला तपासणीसाठी कुडतरी येथील आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. संशयित डॉक्टर 27 तारखेला कामावर आला असता त्याने तिची तपासणी केली. त्यावेळी, सायंकाळी तिला आपल्या खोलीत नेऊन खोलीला आतून कडी घातली. त्यानंतर तिचा विनयभंग केला. घरी आल्यानंतर त्या पीडिताने झालेली घटना आपल्या घरमालकीणीला सांगितली. याबाबत पतीला सांगितल्यानंतर यासंबंधी पोलिसात रितसर तक्रार नोंदविण्यात आली.