दोडामार्ग (सिंधुदुर्ग) : गोव्यातील काणका येथे इंडियन ओव्हरसीज बँकेवर शुक्रवारी भरदिवसा टाकण्यात आलेल्या दरोड्यातील मुख्य संशयिताचे दोडामार्ग कनेक्शन उघड झाले आहे. आरोपीने दोडामार्ग येथेच दरोड्याचा प्लॅन रचल्याचे पुढे येत आहे. गोव्यातील पोलीस आरोपीच्या शोधात शनिवारी पहाटे दोडामार्गमध्ये दाखल झाले होते. मात्र, त्यापूर्वीच त्याने तेथून पलायन केले. या मुख्य संशयिताचे नाव राहुल गिरिधारी दास (२६) असे असून, तो मूळ उत्तरप्रदेशमधील आहे. गेल्या काही महिन्यांपासून तो दोडामार्ग येथील एका हॉटेलमध्ये कामाला असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.
गोव्यातील काणका-आबासवाडा येथे शुक्रवारी इंडियन ओव्हरसीज बँकेवर भरदिवसा दरोडेखोरांनी दरोडा टाकून कॅश काऊंटरमधील ११ लाख, तर एटीएममधील ४ लाख व बँकेत आलेल्या ग्राहकाकडील १ लाख असे १६ लाख रुपये लुटले होते. याव्यतिरिक्त बँकेतील कॅशिअरची सोन्याची अंगठी व त्याच्या मदतीला आलेल्या ग्राहकाची सोनसाखळीही दरोडेखोरांनी लांबविली होती. पळताना त्यांनी आपल्या बचावासाठी हवेत गोळीबार केला होता. त्यावेळी स्थानिक नागरिंकांनी प्रसंगावधान राखत पळून जाणाºया दोघा दरोडेखोरांना पकडले होते. त्यामुळे या दरोड्यातील मुख्य संशयिताचा माग काढण्यात गोवा पोलिसांना यश आले आहे.
‘फिल्मी स्टाईल’ने दरोडाअतिशय ‘फिल्मी स्टाईल’ने टाकण्यात आलेल्या या दरोड्यामुळे गोव्यात खळबळ उडाली होती. पोलीस तपासात या दरोड्याचा मास्टरमार्इंड राहुल गिरिधारी दास हा असल्याचे निष्पन्न झाले आहे. तसेच तो गेल्या काही महिन्यांपासून दोडामार्ग येथे एका हॉटेलमध्ये कामाला असल्याचे समोर आले आहे. शुक्रवारी त्याचे मोबाईल कनेक्शनही दोडामार्ग येथे दाखविण्यात आले. त्यामुळे गोवा पोलीस मुख्य संशयिताच्या शोधात शुक्रवारी पहाटे दोडामार्गमध्ये दाखल झाले होते. मात्र त्यापूर्वीच त्याने पलायन केले.
दोडामार्गातच शिजला कट? संशयित राहुल दास हा मूळ उत्तरप्रदेश येथील असून गुरूवारी त्याने आपल्या साथीदारांना दोडामार्गमध्ये दरोड्याच्या पूर्वतयारीसाठी बोलावून घेतल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. त्यामुळे दरोड्याचा कट दोडामार्गमधूनच आखल्याचे पुढे येत आहे. दरोड्याच्या पूर्वसंध्येला दोडामार्ग वाहतूक पोलीस राजा राणे यांनी संशयिताची दुचाकी डबल नंबर प्लेट घातल्याच्या कारणाने वाहतुकीचे नियम तोडल्याप्रकरणी जप्त केली होती. त्यानंतर दुसºया दिवशीच हा दरोडा टाकण्यात आला. दरोड्याचे कनेक्शन दोडामार्गपर्यंत आल्याने तालुक्यात खळबळ उडाली असून, परप्रांतीय कामगारांची कसून चौकशी करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.