पणजी : प्रत्येक निवडणुकीला सर्व राजकारणी कसिनो हटविण्याची आश्वासने देतात मात्र प्रत्यक्षात असे काही घडत ाही असे निदर्शनास आणीत राज्यातील चाळीसही आमदारांवर कसिनोंची सत्ता चालते का, असा सवाल आम आदमी पक्षाने केला आहे. या प्रश्नावर येथील बंदर कप्तान जेटी आज ३0 रोजी संध्या. ४.३० वाजता सार्वजनिक धरणे आयोजित केले आहे.
पत्रकार परिषदेत ‘आप’चे प्रदेश सरचिटणीस प्रदीप पाडगावकर म्हणाले की, ‘ मतदारांशी प्रतारणा करुन भाजपात गेलेले पणजीचे बाबुश मोन्सेरात यांनी सत्तेवर आल्यास १00 दिवसात कसिनो हटवीन, असे आश्वासन दिले होते मात्र तो एक मोठा झुमलाच होता.
पक्षाचे प्रवक्ता वाल्मिकी नायक यांनी कसिनोंनी साडेसहा हजार कोटींचा कर बुडविला तरी ४0 ही आमदार गप्प का आहेत, असा सवाल केला. वाल्मिकी म्हणाले की, ‘एकाही आमदाराकडे कसिनोंवर कारवाई करण्याची हिंमत राहिलेली नाही. बाबुश मोन्सेरात यांनी शंभर दिवसात कसिनो काढतो असे आश्वासन दिले होते परंतु ते पाण्यात वाहून गेले आहे.
वाल्मिकी म्हणाले की, ‘पेडणे, तिसवाडी, बार्देस व मुरगाव हे चार तालुके ‘गेमिंग डिस्ट्रीक्ट’ म्हणून पर्यटन खात्याच्या मसुदा धोरणात समाविष्ट केले आहेत. याचाच अर्थ असा की, भविष्यात राज्यात कसिनोंची संख्या वाढणार आहे. राज्याच्या बजेटमध्ये कसिनोंपासून केवळ दोन टक्के महसूल मिळतो व तो त्यांना द्याव्या लागणाºया साधनसुविधांवरच खर्च होतो तर मग हे कसिनो हवेच कशाला? असा सवाल त्यांनी केला असून मुख्यमंत्र्यांनी याबाबत स्पष्टीकरण करावे, अशी मागणी केली आहे.