वासुदेव पागी, पणजीः मोपा विमानतळावरील गोवा माईल्स सेवेवरून गुरूवारी विधानसभेत खडाजंगी झाली. विमानतळावरील गोवा माईल्कासचा काऊन्टर हटविण्याची मागणी विरोधकांची होती. खुद्द सत्ताधारी पक्षाचे आमदार प्रवीण आर्लेकर यांनी वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो यांना प्रश्न करताना "गोवा माईल्स काउऊन्टर रद्द करता की नाही" असा प्रश्न केला.
हा मुद्दा प्रश्नोत्तराचा तासाला भाजपचेच पेडणेचे आमदार प्रवीण आर्लेकर यांनी उपस्थित केला होता. गोवा माईल्समुळे स्थानिक टॅक्सी व्यावसायिकांना खूप त्रास सहन करावा लागतो असे त्यांचे म्हणणे होते. मोपा येथील मनोहर अंतरराष्ट्रीय विमानतळावरील गोवा माईल्सचा काउन्टर बंद करण्याची मागणीही त्यांनी केली. त्यांची हीच मागणी विरोधकांनीही उचलून धरली. विरोधीपक्षनेते युरी आलेमाव यांनीही मोबाईल एपवरील टॅक्सी सेवा बंद करण्यात यावी अशी मागणी केली. मात्र कोणत्याही परिस्थितीत गोवा माईल्सचा काउन्टर बंद केला जाणार नसल्याचे माविन यांनी सांगितले. दर दिवसा १ हजार ते बाराशे लोक गोवा माईल्स सेवेचा वापर करीत असल्याचे आढळून आले असल्याचेही त्यांनी सांगितले.
ह्या प्रश्नावर बाचाबाची वाढत असतानाच मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत उभे राहिले आणि त्यांनी या संबंधी चर्चा करण्यासाठी विरोधी सदस्य व स्थानिक आमदारांच्या समावेशाने संयुक्त बैठक बोलवू असे आश्वासन दिले. त्याचबरोबर सभापतीनी प्रश्न तास संपल्याचेही जाहीर केले आणि या वाक् युद्दावर पडता पडला.