लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : 'आम्ही सेटिंगचे राजकारण करीत नाही. सेटिंग करायचेच असते तर आमच्या एकमेव आमदाराने भाजप सरकारला पाठिंबा देऊन मंत्रिपद घेतले असते, असे प्रत्युत्तर रिव्होल्युशनरी गोवन्स पक्षाचे मनोज परब यांनी विरोधकांना दिले. मी तुम्हाला कधी, कुठे भेटलो ते सांगा. जर मी भेटलो असेल तर त्याचे फोटो सार्वजनिक करा असे खुले आव्हान त्यांनी शिवसेनेचे (शिंदे गट) नेते तथा माजी केंद्रीय मंत्री आनंदराव अडसूळ यांना दिले.
परब हे शिवसेनेच्या संपर्कात असल्याचे विधान मंगळवारी अडसूळ यांनी केले होते. त्यावर परब यांनी 'अडसूळ यांचे विधान खोटे आहे. आरजीवर कुणीही नियंत्रण मिळवू शकत नाही' असे स्पष्ट केले. परब म्हणाले की, 'मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुंबईत 'वर्षा' बंगल्यावर भेट घेतली होती त्यांच्या व्यतिरिक्त कुणाला भेटलो नाही. जर मी वारंवार वर्षा बंगल्यावर जात असेन तर तेथील अधिकाऱ्यांकडे जाऊन मी कधी आणि केव्हा गेलो होतो, हे अडसूळ यांनी तपासावे. जर मनोज परब या नावाने त्यांची अन्य कोणी व्यक्ती भेटत असेल तर ते समजण्याची गरज आहे.
अडसूळ आणि माझी जर खास मैत्री असेल तर त्यांनी गोव्यात आल्यानंतर मला फोन का केला नाही? भाजपने आदेश दिला म्हणून अडसूळ आमच्या विरोधात विधाने करीत नाहीत ना? असा संशय निर्माण होत आहे. भाजपला विरोध करण्याची धमक आरजीतच आहे,' असे परब म्हणाले.
सेनेचे चिरीमिरीचे राजकारण बंद करा
शिवसेनेने चिरीमिरी राजकारण बंद करावे. गोमंतकीय तसेच आरजी अशा राजकारणाला बळी पडणार नाही. शिवसेनेसोबत जाण्याएवढी आरजी रिकामटेकडी नाही. आपल्या अशा विधानांमुळे जर आरजीचे नुकसान होईल असे कुणाला वाटत असेल तर तसे होणार नाही' असेही मनोज परब यांनी सुनावले.
आरजी- शिवसेना एकाच माळेचे मणी: आप
रिव्होल्युशनरी गोवन्स (आरजी) व शिंदे गटाची शिवसेना हे दोन्ही पक्ष एकाच माळेचे मणी आहेत त्यामुळे आरजीने आता शिवसेनेत विलीन व्हावे, अशी टीका आम आदमी पक्षाने (आप) गोवा अमित पालेकर अध्यक्ष परिषदेत केली.
'केवळ मतांचे विभाजन व्हावे, या उद्देशाने भाजपनेच आरजी पक्ष तयार केला आहे. विधानसभा निवडणुकीतही ते दिसून आले. त्यामुळे भाजपचाच अजेंडा आरजी पुढे नेत आहे,' असा आरोप त्यांनी केली. 'आरजी व भाजप एकमेकांवर टीका करून केवळ जनतेची फसवणूक करीत आहे, तर दुसरीकडे भाजप व शिंदे गटाची शिवसेना हे महाराष्ट्रात एकत्र सत्तेत आहेत. त्यामुळे आरजी व शिवसेना एकाच माळेचे मणी असल्याचे सिद्ध होते,' अशी टीका त्यांना केली. पालेकर म्हणाले की, 'आम आदमी पक्षाला राष्ट्रीय दर्जा मिळाला आहे. भारतातील सरकारचे भविष्य हे 'केजरीवाल' मॉडेलच आहे असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
आमदार व्हेन्झी व्हिएस म्हणाले, 'आप हा देशातील एकमेव राजकीय पक्ष आहे की, ज्याने कमी कालावधीत आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रात लक्षणीय प्रगती केली. जे भाजप व कॉग्रेसला दीर्घकाळ सत्तेत असूनही जमले नाही ते आपने केले. भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी केजरीवाल मॉडेलच हवे आप गोवाचे प्रभारी दीपक सिंगला 'उपाध्यक्ष वाल्मिकी नाईक, उपाध्यक्ष अॅड. सुरेल तिळवे व सहप्रभारी चेतन रावल उपस्थित होते.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"