लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: मराठा समाजाच्या आमदारांची संख्या भविष्यात ७ वरून १४ होईल, या कुंभारजुवेचे आमदार राजेश फळदेसाई यांनी केलेल्या विधानाचा निषेध करत तृणमूल कॉंग्रेसचे नेते समील वळवईकर यांनी ‘यावरून भाजपला आता मराठा समाज वगळता अन्य समाजाची मते नको आहेत का?' असा सवाल केला.
मराठा समाजाच्या आमदारांच्या संख्येवरून फळदेसाई यांच्या या विधानावर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी स्पष्टीकरण द्यावे. यावरून भाजपचे धर्माचे तसेच जातीचे राजकारण उघड झाल्याची टीका त्यांनी केली. समील वळवईकर म्हणाले की, फळदेसाई हे आमदार म्हणून कुंभारजुवेतून कॉंग्रेसच्या तिकिटावरून आणि सर्व समाजातील लोकांच्या मतांनी निवडून आले आहेत. त्यामुळे त्यांनी अशा प्रकारची विधाने करू नयेत. भाजप सबका साथ, सबका विकास म्हणत सर्व धर्मांचा व जातींचा अभिमान असल्याचे सांगते. मग त्यांच्या आमदारांनी असे विधान कसे केले? मराठा समाजाचे जे आमदार निवडून आले, ते केवळ मराठा समाजाच्याच मतांच्या आधारे आमदार झालेले नाहीत. मात्र फळदेसाईंच्या विधानावरून भाजपला अन्य समाजाची मते नको का ? असा प्रश्न उपस्थित झाला आहे,' अशी टीका त्यांनी केली.
वळवईकर म्हणाले की, गोव्यात ख्रिश्चिन, एससी, एसटी, बहुजन समाजातील विविध जातींचे मतदार आहेत. उलट राजेश फळदेसाई यांनी केलेले विधान हे इतकी वर्ष राजकारणात असलेले केंद्रीय राज्य मंत्री श्रीपाद नाईक व एसटी समाजाचे नेतृत्व करणारे क्रीडा मंत्री गोविंद गावडे यांच्यावर अन्याय करणारे आहे. भाजपने नेहमीच जातीच्या आधारे होणाऱ्या जनगणनेचा विरोध केला. ते केवळ जातींच्या आधारे राजकारण करतात हे यावरून पुन्हा सिद्ध झाले, असा आरोप वळवईकर यांनी केला.
आम्ही ३० निवडून आणू : उपेंद्र गावकर
कुंभारजुवे आमदार राजेश फळदेसाई यांनी मराठा समाजाच्या आमदारांची संख्या ७ वरून १४ करू असे विधान केले. मात्र, आता आम्ही २०२७ च्या विधानसभा निवडणुकीत ओबीसी, एससी व एसटी समाजाच्या आमदारांची संख्या ३० करु, अशी भूमिका गोमंतक बहुजन महासंघाने मांडली. संघाचे उपेंद्र गावकर म्हणाले की, सध्या बहुजन समाजाच्या आमदारांची १० ते १५ इतकीच आहे. मात्र, पुढील निवडणुकीत ती नक्कीच वाढेल. त्यासाठी आम्ही प्रयत्न करू.