पणजी : युक्रेनच्या डॉनबास या सिनेमाला या वर्षीचा इफ्फीचा सर्वोत्तम सिनेमाचा सुवर्ण मयूर पुरस्कार मिळाला. पटकथाकार सलीम खान यांना सिनेमा क्षेत्रातील लक्षणीय कामगिरीसाठी विशेष पुरस्कार देण्यात आला. युनोस्कोचा गांधी मेडल पुरस्कार लद्दाखी भाषेतील वाँकिंग विथ द विंड या सिनेमाला देण्यात आला. गोव्यात शामाप्रसाद मुखर्जी स्टेडियममध्ये रंगतदार कार्यक्रमाने २० नोव्हेंबरपासून सुरु झालेल्या ४९ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची सांगता झाली. या कार्यक्रमाला केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार) के. जे. अल्फोन्स, गोव्याच्या राज्यपाल मृदुला सिन्हा, गोव्याचे नगर नियोजन मंत्री विजय सरदेसाई, केंद्रीय माहिती आणि प्रसारण सचिव अमित खरे, समारंभाचे प्रमुख पाहुणे अनिल कपूर तसेच माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते. चित्रपटाच्या ‘आनंदाचा प्रसार’ ही यावर्षीची इफ्फीची संकल्पना होती. सुवर्णमयूर, रौप्यमयूर, जीवनगौरव पुरस्कार आणि इंडियन पर्सनॅलिटी ऑफ द इयर पुरस्कार या कार्यक्रमात प्रदान करण्यात आले.चित्रपटसृष्टीतल्या लक्षणीय योगदानाबद्दल सलीम खान यांना इफ्फी विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांच्या वतीने अरबाझ खान यांनी हा पुरस्कार स्वीकारला. सर्गेई लोझनित्सा दिग्दर्शित युक्रेनियन चित्रपट ‘डॉनबास’ला इफ्फी २०१८ चा सर्वोत्कृष्ट चित्रपट सन्मान प्राप्त झाला. सुवर्ण मयूर, मानपत्र आणि ४० लाख रुपये असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. पुरस्काराची रक्कम दिग्दर्शक आणि निर्माते यांना समान विभागून देण्यात येते. ‘डॉनबास’ चित्रपटात पूर्व युक्रेनमधल्या दोन फुटीरतावादी गटातला सशस्त्र संघर्ष, हत्या, दरोडे यांबाबतची कथा आहे.‘इ मा योव्ह’ या चित्रपटासाठी लिजो जोस पेलिस्सरी यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून १५ लाख रुपये आणि रौप्य मयूर देऊन सन्मानित करण्यात आले. ॲनास्ताशिया पुश्तोवित यांना ‘व्हेन द ट्रीज फॉल’ या युक्रेनियन चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्काराने गौरवण्यात आले. चेंबन विनोद या ‘इ मा योव्ह’ चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. प्रत्येकी १० लाख रुपये आणि रौप्य मयूर पुरस्काराने सर्वोत्कृष्ट अभिनेता आणि अभिनेत्रीला गौरवण्यात आले.‘इ मा योव्ह’ या चित्रपटात मृत्यू आणि त्याचा मानवी जीवनावर होणारा परिणाम उपरोधिक पद्धतीने मांडण्यात आला आहे. या चित्रपटात चंबन यांनी ‘एशी’ची भूमिका साकारली आहे. वडिलांवर योग्य रितीने अंत्यसंस्कार होण्यासाठी धडपडणाऱ्या एशीला अनाकलनीय समस्यांना तसेच विविध स्तरातल्या प्रतिक्रियांना तोंड द्यावे लागते. ‘व्हेन द ट्रीज फॉल’ या चित्रपटात पाच वर्षाची बंडखोर मुलगी वितका, तिची किशोरवयीन चुलत बहिण लारस्या आणि तिचा मित्र सिएर यांची कथा मांडण्यात आली आहे. ग्रामीण युक्रेनमधले भीषण दारिद्रय, उपेक्षा आणि वंशवाद यावर या चित्रपटात भाष्य करण्यात आले आहे. ॲनास्ताशिया पुश्तोवित यांनी लारस्याची भूमिका साकारली आहे.‘अगा’ या याकूत चित्रपटासाठी मिल्को लाझारोव्ह यांना विशेष ज्युरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. १५ लाख रुपये आणि रौप्य मयूर असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. या चित्रपटात सेडना आणि नानूक या याकुतियामधल्या वृद्ध जोडप्याला बर्फाळ प्रदेशात सामोऱ्या जावे लागणाऱ्या विशिष्ट समस्यांचा वेध घेण्यात आला आहे. ‘रेस्पेटो’ या फिलिपिनो चित्रपटासाठी अल्बेर्टो मॉन्टेरस द्वितीय यांना फिचर फिल्मसाठीचा उत्तम दिग्दर्शक पदार्पणासाठीचा शताब्दी पुरस्कार प्रदान करण्यात आला.‘वॉकिंग विथ द विंड’ या प्रवीण मोरछले दिग्दर्शित लडाखी चित्रपटाला आयसीएफटी युनेस्को गांधी पदकाने सन्मानित करण्यात आले. पॅरिस इथल्या इंटरनॅशनल कौन्सिल फॉर फिल्म, टेलिव्हिजन ॲण्ड ऑडिओ व्हिज्युअल कम्युनिकेशन आणि युनेस्को यांच्या वतीने हा पुरस्कार देण्यात येतो. शांतता आणि सलोखा ही गांधीवादी मूल्ये मांडणाऱ्या चित्रपटाला हा सन्मान प्रदान करण्यात येतो. ‘वॉकिंग विथ द विंड’ या चित्रपटात हिमालयीन प्रदेशातल्या आपल्या मित्राची शाळेतील खुर्ची मोडणाऱ्या १० वर्षाच्या मुलाची गोष्ट सांगण्यात आली आहे. ‘लॉस सिसोन्सिअस’ ब्रिटीझ सेग्नर दिग्दर्शिक पोर्तुगीज आणि स्पॅनिश भाषेतील चित्रपटाचा आयसीएफटी-युनेस्को गांधी पदक विभागात विशेष उल्लेख करण्यात आला.चित्रपट कलाकार अर्जन बाजवा आणि सोफी चौधरी यांनी इफ्फी २०१८ च्या सांगता सोहळ्याचे सूत्रसंचालन केले. या सोहळ्यासाठी अनिल कपूर, राकुल प्रीत, चित्रांगदा सिंग, डियाना पेंटी, किर्थी सुरेश आदी चित्रपट सृष्टीतील मान्यवर उपस्थित होते. अभिनेता कबीर बेदी आणि गायक विपिन अनेजा यांच्या सादरीकरणाने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.
डॉनबासनं पटकावला इफ्फीचा सर्वोत्तम सिनेमाचा पुरस्कार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2018 8:59 PM