फोंडा : जनतेच्या आशा-आकांक्षांना पायदळी तुडविलेल्या भाजपसोबत कदापि युती करणार नाही, हे आम्ही कालही सांगितले होते, आजही सांगतोय. तृणमूलबरोबर आमची युती ही पक्की झाली असून, तृणमूलने आपले उमेदवार मंगळवारी घोषित केले आहेत. तर गुरुवारी सकाळी मगोपचे उमेदवार जाहीर करण्यात येतील, असे मगो पक्षाचे अध्यक्ष दीपक ढवळीकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
मगोप-भाजप युतीबाबत बुधवारी सकाळपासून समाज माध्यमावर चर्चा सुरू होती. त्यासंदर्भात ढवळीकर यांनी स्पष्टीकरण दिले. ढवळीकर म्हणाले की, भाजपाला आपला पराभव समोर दिसू लागला आहे. त्यांनी केलेल्या गैरकारभाराचा पाढा आता जनता वाचू लागली आहे. जनतेकडून प्रतिसाद मिळत नाही, ते पाहून त्यांच्या पायाखालची जमीन सरकू लागली आहे, असे ढवळीकर म्हणाले.
जनतेच्या रोषाची कल्पना आल्यानेच सभापती राजेश पाटणेकर यांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे. आज तिथे त्यांची उमेदवारी स्वीकारायला कोणी तयार नाही, म्हणूनच मगोप व भाजप युतीसारख्या फसव्या गोष्टी पसरवून ते लोकांची दिशाभूल करीत आहेत. लोकांचे मन वळविण्याचा तो खुजा प्रयत्न आहे; परंतु त्यांच्या असल्या सवंग कारनाम्यांना जनता भुलणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.