मुख्यमंत्री तंदुरुस्त, काँग्रेसनं चिंता करु नये; भाजपाचा काँग्रेसला टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2018 09:20 PM2018-06-23T21:20:19+5:302018-06-23T21:26:04+5:30
काँग्रेस प्रदेशाध्यक्षांच्या विधानाचा भाजपाकडून समाचार
पणजी : मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर हे पूर्ण तंदुरुस्त असून त्यांनी प्रशासनावर लक्ष केंद्रीत केले आहे. त्यामुळे काँग्रेसने मुख्यमंत्र्यांची चिंता करु नये, असे भाजपाचे सरचिटणीस सदानंद शेट तानावडे यांनी म्हटले. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी मुख्यमंत्र्यांना आरोग्यविषयक सल्ले देऊ नयेत, असंही तानावडे म्हणाले. त्यांनी माजी मंत्री राजेंद्र आर्लेकर यांच्यासोबत पत्रकार परिषद घेतली.
पर्रिकर यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्या आणि तब्येतीची काळजी घ्यावी, असे चोडणकर म्हणाले होते. चोडणकर यांच्या या विधानाचा आम्ही निषेध करतो, असे तानावडे म्हणाले. मुख्यमंत्र्यांना सल्ला देणारे चोडणकर हे कोण असा प्रश्न विचारून तानावडे म्हणाले, की मुख्यमंत्री सक्षम असून सरकारही पूर्णपणे स्थिर आहे. मुख्यमंत्री जेव्हा अमेरिकेहून गोव्यात परतले, तेव्हा काँग्रेसचे काही आमदार व्यक्तीश: जाऊन पर्रिकर यांना भेटले. तुम्ही आला हे बरे झाले व पूर्वीप्रमाणे तुम्ही राज्याचा कारभार पुढे न्यावा, असे काँग्रेसच्या आमदारांनी पर्रिकर यांना सांगितले. गिरीश चोडणकर यांना हे ठाऊक नाही, त्यांनी त्याविषयी माहिती करून घ्यावी, असा सल्ला तानावडे यांनी चोडणकर यांना दिला.
तानावडे म्हणाले, की चोडणकर हे युवक काँग्रेसचे अध्यक्ष असताना अपरिपक्व वागत होते. आता ते प्रदेशाध्यक्ष असल्याने त्यांनी अपरिपक्व विधाने करू नयेत. पर्रिकर अमेरिकेहून परतल्याने चोडणकर व काँग्रेसमधील त्यांच्या अन्य काही साथीदारांचे धाबे दणाणले आहे. त्यांनी स्वत:चे सोळा आमदारच एकत्र ठेवण्यावर लक्ष केंद्रीत करावे. चोडणकर किंवा त्यांचे कोणतेच साथीदार कधी सरपंच, पंच व आमदार झालेले नाहीत, असंही तानावडे यांनी म्हटलं.