मडगाव: खलाशी आणि विदेशस्थ गोवेकर यांच्याबाबत निर्णय घेताना माणुसकी दाखवा त्यांच्याकडून क्वारंटाईनच्या नावाखाली खंडणी वसूल करू नका असा सल्ला गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी सरकारला दिला आहे. सध्या पेड क्वारंटाईन निर्णयाला सगळीकडून विरोध होत असताना सरदेसाई यांनी हा सल्ला दिला आहे.
जागतिक आरोग्य संघटनेच्या 2005 च्या मार्गदर्शक तत्वाप्रमाणे जगात कुणीही अडकून पडले आणि त्याला मायभूमीत यायला पाहिजे असेल तर त्याला पैशासाठी अडवून ठेवता कामा नये. महामारी सारख्या परिस्थितीत नागरिकांना पुरेशा सोयीनुसार आसरा देणे हे सरकारचे कर्तव्य आहे, हे सरकारने विसरता कामा नये. गोव्यात येणाऱ्या खलाशाना आणि लोकांना क्वारंटाईनची सोय करून देणे गोवा सरकारचे कर्तव्य आहे हे विसरता कामा नये असे त्यांनी म्हटले आहे.
आखाती देश, यूरोप आणि अमेरिका या भागात कित्येक गोमंतकीय आहेत त्यांना गोव्यात यायचे आहे. कित्येकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. अशा लोकांकडून सरकार पैसे वसूल करणार का असा सवाल करून यापूर्वी जे नेते यापूर्वी आपण या खलाशांचे त्राते म्हणून मिरवीत होते ते आता गप्प का असा सवाल त्यांनी केला आहे.