मडगाव: वास्को- कॅसलरॉक दरम्यानच्या रेल्वे दुपदरीकरणाचे काम जमीन उपलब्ध होत नसल्यामुळे रखडले आहे. तसेच प्रकल्पाला गोवा सरकारकडून जर जमीन उपलब्ध झाली नाही तर निरुपायाने दुसऱ्या कुठल्या तरी राज्यात दुपदरीकरणाचे काम हाती घ्यावे लागेल असा इशारा बुधवारी संदेश केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांनी दिला.
मडगाव रेल्वे स्थानकावर पाच कोटी रुपये खचरून बांधण्यात येणाऱ्या रेल्वे पदपुलाची कोनशिला बसविण्याच्या कार्यक्रमात बोलताना त्यांनी हा इशारा दिला. ते म्हणाले, गोवा सरकारकडे आम्ही जमीन उपलब्ध करुन देण्यासाठी विनंती केली आहे. यावेळी केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक, राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर, मडगावचे आमदार दिगंबर कामत, कोकण रेल्वेचे व्यवस्थापकीय संचालक संजय गुप्ता तसेच पश्र्चिम-दक्षिण रेल्वेचे सरव्यवस्थापक ए. के. सिंग हे उपस्थित होते.
गोव्यात कित्येक ठिकाणी या दुपदरीकरणाला विरोध होत असून त्या पाश्र्र्वभूमीवर बुधवारी रेल्वे राज्यमंत्र्यांनी इशारा दिला. ते म्हणाले, गोवा हे पर्यटनस्थळ असून रेल्वेमार्फत पर्यटकांना सुविधा दिल्यास जास्तीत जास्त पर्यटक रेल्वेमार्गे गोव्यात येऊ शकतील. या पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी रेल्वे स्थानके व रेल्वे परिसर स्वच्छ व प्लास्टीक मुक्त असण्याची गरज आहे. त्यासाठी लोकांकडून व प्रवाशांकडून त्यांनी सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली.
केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनी, गोव्यातील पर्यटनाच्या दृष्टीने रेल्वेचा विकास करण्यासाठी त्यांच्या खात्यातून काही मदत हवी असल्यास ते देण्याची आपली तयारी असल्याचे त्यांनी सांगितले. मडगावात जो फूटब्रिज होऊ घातला आहे ती मागच्या कित्येक वर्षाची मागणी होती. हे काम लवकरात लवकर पूर्ण करुन त्याचे लोकार्पण व्हावे यासाठी कंत्रटदाराने जलदगतीने काम करावे असे आवाहन त्यांनी केले.
मडगावच्या कोंकण रेल्वे स्थानकावर तिरंगा
रेल्वे मंत्रलयाच्या धोरणाप्रमाणो देशातील प्रत्येक ए-1 दर्जाच्या रेल्वे स्थानकावर यापुढे भारतीय राष्ट्रध्वज लावण्यात येणार असून त्याचाच भाग म्हणून बुधवारी रेल्वे राज्यमंत्री अंगडी यांच्या हस्ते मडगाव स्थानकावर तिरंगा फडकाविण्यात आला. 30 फूट x 20 फूट आकाराचा हा तिरंगा शंभर फूट उंचीवर बांधण्यात आला असून रेल्वे स्थानकाच्या कुठल्याही कोनातून हा तिरंगा प्रवाशांना दिसू शकणार आहे.