लोकमत न्यूज नेटवर्क मडगाव : मानवी जीवनात विज्ञान खूप महत्त्वाची भूमिका बजावते. विश्वगुरु बनण्यासाठी विज्ञान व तंत्रज्ञानावर जास्त भर द्यायला हवा. त्या पद्धतीची मानसिकता विकसित व्हायला हवी. नवे तंत्रज्ञान, आर्टिफिशियल इंटेलिजन्स यावर आधारित अभ्यासक्रम हवेत. विज्ञान व तंत्रज्ञानामध्ये प्रगती करण्याबरोबर स्रोतांच्या बाबतीतही विकास होणे गरजेचे आहे, असे मत प्रख्यात अणुऊर्जा शास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ. अनिल काकोडकर यांनी गुरुवारी येथील गोमंत विद्यानिकेतन संस्थेच्या विचारवेध व्याख्यानमालेमध्ये व्यक्त केले. 'भारतीय विज्ञान : ७५ वर्षे आणि त्यापुढे' या विषयावर ते बोलत होते.
उद्योग-व्यवसाय आणि सरकार यांच्यामधील तणाव दूर व्हायला हवे, ज्ञानाचा प्रसार व्हायला हवा. धोरणांची आखणी ही सर्व घटकांना बरोबर घेऊन व्हायला हवी. भविष्यातील हित लक्षात घेऊन सरकारी गुंतवणूक करणे गरजेचे आहे. भारताची अर्थव्यवस्था निश्चितच सुधारत चालली आहे. पण त्याचबरोबर दरीही वाढत चालली आहे, असे डॉ. काकोडकर पुढे म्हणाले.
सध्याची प्रगती पुरेशी नाही. ज्ञान आहे; पण आत्मविश्वासाचा अभाव आहे. अनेक गोष्टी अधिक स्वस्तात आणि अधिक उच्च दर्जाच्या उपलब्ध आहेत यात शंका नाही, असे ते म्हणाले. जगात सर्वांत जास्त लोकसंख्या असलेला देश आहोत. भारत ही जगातील सर्वांत मोठी बाजारपेठ आहे आणि त्याचबरोबर भारतात विविध संस्कृतींमधील संघर्षही आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले. देशाला गतवैभव प्राप्त करून देण्याच्या दृष्टीने प्रयत्न व्हायला हवेत. भारताकडे जगाला आकार देण्याची आवश्यक क्षमता आहे. पारंपरिक वनौषधींची परंपराही मोठी आहे, असे उद्गार त्यांनी काढले.
मूल्यव्यवस्था बदलावी
नव्या शैक्षणिक धोरणात्मक विविध गोष्टींवर भर देण्यात आलेला आहे; पण आता जीवनातील मूल्यव्यवस्था बदलायला हवी. उद्योजकांचा आदर करून त्यांना संशोधनासाठी प्रेरित करायला हवे. वैयक्तिक स्तरावर दोषारोप करून काही फायदा होणार नाही. भारतीय देशाबाहेर खूप चांगली कामगिरी करत आहेत, असे डॉ. काकोडकर म्हणाले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"