समीर नाईक,पणजी: प्रख्यात कोंकणी लेखक आणि गोवाविद्यापीठाचे कोंकणी विषयाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. प्रकाश पर्येकर यांना कोंकणीतील कथासंग्रह ‘वर्सल’ साठी दिल्लीस्थित साहित्य अकादमीचा प्रतिष्ठित पुरस्कार प्राप्त झाला आहे. त्यांच्या या उपलब्धीमुळे गोवाविद्यापीठाचे नाव अधिक आदराने घेतले जात आहे. त्यांनी विद्यापीठाचा गौरव केला आहे, आणि आम्हाला अभिमानस्पद होण्याची संधी प्रदान करुन दिली आहे, असे मत गोवा विद्यापीठाचे कुलगुरु प्रो. हरीलाल मेनन यांनी व्यक्त केले.
प्रतिष्ठित साहित्य अकादमी पुरस्कारासाठी डॉ. पर्येकर यांची निवड होणे, हे त्यांचे साहित्यिक यश, अपवादात्मक समर्पण आणि प्रतिभा प्रतिबिंबित करते. डॉ. पर्येकर यांची साहित्यासाठीची बांधिलकी खरोखरच प्रशंसनीय आहे. आमच्या प्राध्यापकांमध्ये डॉ. पर्येकर यांच्यासारखा कुशल लेखक असल्याचा आम्हाला अभिमान आहे, असे प्रो. हरीलाल मेनन यांनी यावेळी सांगितले.
जाग प्रकाशनने २०२१ मध्ये प्रकाशित केलेला डॉ. प्रकाश पर्येकर यांचा ‘वर्सल’ हा लघुकथा संग्रह गोवा विद्यापीठात स्थापना दिनानिमित्त गोवा विद्यापीठाचे कुलपती तथा राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. या पुस्तकाचे कन्नडमध्ये भाषांतर डॉ. गीता शेणोई यांनी केले असून, "वर्सल मट्टू इथरा लटकागलू" या शीर्षकाने हे पुस्तक प्रसिध्द झाले आहे. तसेच राज्यात इंग्रजीत अनुवादीतही 'वर्सल' हे पुस्तक प्रकाशित झाले आहे. विद्या पै यांनी हे पुस्तक इंग्रजीत अनुवादित केली आहे. गोवा विद्यापीठातील इतर सर्व अधिकारी, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी डॉ. प्रकाश पर्येकर यांना त्यांच्या उपलब्धीबद्दल अभिनंदन केले आहे.