लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: पोर्तुगीज काळात हिंदूवर धर्मपरिवर्तनासाठी अनन्वित अत्याचार केले जात होते. गोव्यातील हिंदूंच्या रक्षणासाठी प्रथम छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांनी पोर्तुगीजांशी दोन होत केले. त्यांच्यामुळेच गोमंतकात हिंदू आणि हिंदू संस्कृती टिकू शकली, असे प्रतिपादन गोवा विद्यापीठातील मराठी विभागाचे डॉ. विनय मडगावकर यांनी केले.
मेरशी येथील स्वराज्य युवा फाऊंडेशनच्या पेरीभाट येथील सातेरी मंदिरात शिवजयंती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते चेतन राजहंस, देवस्थानचे विश्वस्त अॅड. प्रशांत वेंगुर्लेकर, फाऊंडेशनचे अध्यक्ष विजय पाटील उपस्थित होते.
छत्रपती शिवरायांनी नार्वे येथील सप्तकोटेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार केला. तेथे आजही शिवरायांचे नाव असलेला संस्कृत शिलालेख पाहायला मिळतो. असा संस्कृत शिलालेख रायगडानंतर सप्तकोटेश्वर मंदिरातच आहे. मंदिराच्या उंबरठ्यावर छत्रपती शिवरायांची पावले आणि हातांचे ठसे आहेत, असे डॉ. मडगावकर यांनी यावेळी सांगितले.
भारतातील हिंदू समाज मोगलांच्या गुलामगिरीत पिचला असताना छत्रपती शिवरायांनी स्वराज्याचे स्वप्न सत्यात उतरवले. स्वतःचे कायदे बनवले. स्वतःची मुद्रा चलनात आणली. हिंदवी स्वराज्य स्थापन केले, असे राजहंस यांनी सांगितले.
दरम्यान, या निमित्ताने फर्मागुढी- फोंडा ते सातेरी मंदिर मेरशीपर्यंत शिवज्योतीची मिरवणूक काढण्यात आली. शिवरायांच्या मूर्तीला हार घालून आणि दीपप्रज्वलनाने कार्यक्रमास सुरुवात झाली. सकाळी रांगोळी स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेचे परीक्षण संजना रेडकर व सागर मांगले यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. नीता तोरणे यांनी केले, तर अमित गावडे यांनी आभार मानले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"