पंकज शेट्ये, लोकमत न्यूज नेटवर्क, वास्को : अनेकजण सकाळी उठताच दिवसाची सुरुवात गरमागरम कॉफीने करतात. कॉफी सेवनामुळे मनुष्याच्या शरीरातील ऊर्जा वाढण्याबरोबरच, थकवा दूर करण्यास मोठी मदत करते. कॉफीमुळे मेंदूचे आरोग्य चांगले राहण्यासाठी मोठी मदत मिळते. तसेच अल्झायमर, पार्किन्सनसारखे आजार कॉफी पिल्यामुळे दूर ठेवण्यास मदत मिळते. कॉफी पिल्यामुळे यकृत, हृदयाचे आरोग्य तंदुरुस्त ठेवण्यास मोठी मदत मिळते, असे क्लिनिकल डाएटिशन स्विजल त्रावासो यांनी सांगितले.
कॉफी हे अनेकांचे आवडते पेय असून काही लोक दिवसाला तीन ते चार कप कॉफी पितात. कॉफीमुळे आरोग्याला अनेक फायदे प्राप्त होतात, अशी माहिती क्लिनिकल डाएटिशन स्विजल यांनी चर्चा करताना दिली. सामान्य व्यक्ती ज्याला कुठलीच आरोग्याची समस्या नाही, त्याने दिवसाला दोन ते तीन कप कॉफीचे सेवन केल्यास त्याच्या आरोग्याला ते फायदेशीर ठरू शकते.
कॉफीमध्ये कॅफेन पदार्थाचा समावेश असून ती पिल्यामुळे मनुष्याच्या शरीरातील ऊर्जा पातळी वाढते. खेळाडू, व्यायाम करणारे अनेक तरुण स्वतःतील थकवा दूर करून शरीरात ऊर्जा वाढवण्यासाठी कॉफीचे सेवन करतात. कॉफी 'एनर्जी बूस्टर' असल्याचे अनेकांचे मानणे आहे. कॉफीमुळे मेंदूचे आरोग्य चांगले ठेवण्यास मदत मिळू शकते.
कॉफी पिल्यामुळे आरोग्याला विविध फायदे मिळतात. मात्र, कॉफीच्या अतिसेवनामुळे आरोग्याला त्रासही होऊ शकतो, अशी माहिती स्विजल यांनी दिली. कॉफीच्या अतिसेवनामुळे उच्च रक्तदाबाची समस्या निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच कॉफीच्या अतिसेवनामुळे एखाद्याला 'इन्सोम्निया' नामक समस्या निर्माण होऊ शकते. तसेच झोप न येण्याची समस्या निर्माण होऊ शकते. तसेच कॉफी अतिसेवनामुळे माणसात चिंताग्रस्त होण्याची समस्या निर्माण होऊ शकते. ज्यांना रक्तदाबाची समस्या आहे त्यांनी डॉक्टरांचा सल्ला घेऊनच कॉफीचे सेवन करावे. तसेच गर्भवती महिला, स्तनपान करणाऱ्या महिलांनी, वृद्ध नागरिकांनी डॉक्टरांचा सल्ला घेऊनच कॉफीचे सेवन करावे, असे स्विजल त्रावासो यांनी सांगितले.
यकृत, हृदयाचीही ठेवते काळजी
कॉफीमुळे अल्झायमर, पार्किन्सनसारखे आजार दूर राहण्यास मोठी मदत मिळते, अशी माहिती त्यांनी दिली. कॉफी यकृताचे आरोग्य चांगले ठेवण्यास मदत करू शकते. कॉफी सेवनामुळे यकृताचे आरोग्य चांगले राहण्यास मदत मिळते. कॉफी सेवनामुळे हृदयाचे आरोग्य चांगले राहण्यास मदत मिळते.
कॉफीमुळे हृदयविकाराचा हृदय निकामी होणे इत्यादी झटका, हृदयाशी जुळलेले आजार दूर ठेवण्यास मोठी मदत मिळू शकते, अशी माहिती स्विजल यांनी दिली. नियंत्रणात केलेल्या कॉफी सेवनामुळे आरोग्याला अन्य फायदे मिळू शकतात, असेही त्यांनी सांगितले.