लोकमत न्यूज नेटवर्क
वास्को: दक्षिण गोव्यातील वास्को शहरात निवारा केंद्रा (शेल्टर होम) मध्ये आश्रयासाठी असलेल्या एका नागरीकाने बाहेर जाऊन मद्य सेवन करून परतल्यानंतर येथेच आश्रयासाठी असलेल्या अन्य एका नागरिकाशी वाद घालून त्याच्यावर हल्ला केला. निवारा केंद्रात आश्रय घेतलेल्या साजीत फकीर (वय ३०, रा: महाराष्ट्र) ने गीरीप्रसाद छेत्री (वय २९, रा: आसाम) याच्या डोक्यावर प्लास्टीक खुर्ची ने हल्ला केल्याने त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून चिखली उपजिल्हा इस्पितळात त्याच्यावर उपचार करण्यात आले.
गुरूवारी (दि.७) संध्याकाळी ४ च्या सुमारास ही घटना घडली. लॉकडाऊन च्या काळात अडकलेल्या विविध राज्यातील नागरिकांना आश्रय देण्यासाठी वास्कोतील सरकारी उच्चमाध्यमिक विद्यालय मध्ये निवारा केंद्राची सरकारतर्फे व्यवस्था करण्यात आली आहे. लॉकडाऊन मुळे अडकलेल्या २५ विविध ठीकाण्यावरील नागरिकांना येथे सद्या आश्रय देण्यात आलेला आहे. गुरूवारी येथे सद्या असलेला साजीत फकीर व अन्य काही जण निवारा केंद्रामधून बाहेर निघाल्यानंतर त्यांनी दारूचे सेवन करून ते पुन्हा येथे आल्याची माहीती सूत्रांकडून प्राप्त झाली. यानंतर साजीत फकीर यांनी निवारा केंद्रामध्ये असलेल्या गीरीप्रसाद शी विनाकारण वाद घालण्यास सुरवात केली. यानंतर साजीत ने जवळच असलेल्या प्लास्टीक खुर्चीने गीरीप्रसाद च्या डोक्यावर हल्ला केला. तसेच त्यांने त्याची लाथा - बुक्क्यांने जबर मारहाण केली. गीरीप्रसादवर हा हल्ला झाल्याने त्याच्या डोक्याला गंभीर जखमा होत डोक्यातून रक्तस्त्रावास सुरवात झाली. गीरीप्रसाद वर हल्ला होऊन तो जखमी झाल्याने त्याला नंतर त्वरित उपचारासाठी चिखली उपजिल्हा इस्पितळात नेण्यात आले. त्याच्या डोक्याला दहा टाके मारण्यात आलेले असल्याची माहीती वास्को पोलीस सूत्रांकडून प्राप्त झाली. साजीत फकीर ने हल्ला केल्यानंतर घटनास्थळावरून धाव घेतली, मात्र पोलीसांनी त्वरित कारवाई करून त्याला गजाआड केला.
या घटनेची माहीती मिळताच मुरगावचे उपजिल्हाधिकारी परेश फळदेसाई, मामलेदार सतीश प्रभू तसेच इतर अधिकाºयांनी वास्कोतील या निवारा केंद्रमध्ये धाव घेऊन घडलेल्या घटनेची माहीती घेतली. तसेच पोलीस उपनिरीक्षक प्रज्योती देसाई, पोलीस उपनिरीक्षक रितेश तारी यांनी त्वरित घटनास्थळावर दाखल होऊन चौकशी केली. दारू पिऊन विनाकारण गीरीप्रसाद वर हल्ला केलेल्या साजीत फकीर याच्याविरुद्ध पोलीसांनी भादस ३२४, ५०४ कलमाखाली गुन्हा नोंद करून त्याला अटक केली असल्याची माहीती पोलीस उपनिरीक्षक प्रज्योती देसाई यांनी दिली. साजीत फकीर यांने दारू सेवन केले होतो काय हे जाणून घेण्यासाठी त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून अहवाल मिळाल्यानंतरच याबाबत स्पष्टीकरण होणार असे पोलीसांनी कळविले.
या निवारा केंद्रमध्ये राहणारे अन्य काही जण सुद्धा बरेच दारूच्या नशेत असल्याचे गुरूवारी संध्याकाळी दिसून आले असून आश्रयासाठी येथे राहणाºयांचा काय हा प्रकार असा प्रश्न अनेकात निर्माण झालेला आहे. याबाबत अधिक माहीती घेण्यासाठी मुरगावचे उपजिल्हाधिकारी परेश फळदेसाई यांना संपर्क केला असता मारहाण करणाºया त्या व्यक्तीने दारूचे सेवन केले होते अशी त्यांना माहीती मिळालेली असल्याचे सांगितले. सदर निवारा केंद्रमध्ये त्यांची राहण्याची व्यवस्था करण्यात आलेली असून ते कधी कधी बाहेर ये - जा करतात. दारू पिऊन मारहाण केल्याची ही घटना गंभीर असून यापुढे अशी घटना घडू नये यासाठी कडक रित्या उचित पावले उचलण्यात येणार अशी माहीती उपजिल्हाधिकारी परेश फळदेसाई यांनी शेवटी दिली.