सुशांत कुंकळयेकर
मडगाव : पर्यटकांना गोव्यात येऊन जीवाचा गोवा करायचा असेल तर अवश्य करा. मात्र सार्वजनिक जागेवर किंवा बीचवर दारू पिण्याचे टाळा. 1 मार्चनंतर गोव्यात उघडय़ावर दारू प्यायल्यास तुमच्यावर तुरुंगात जाण्याची पाळी येऊ शकेल हे जरा ध्यानात ठेवा. मुख्यमंत्री मनोहर र्पीकर यांनी बुधवारी मडगावात झालेल्या एका कार्यक्रमात ही माहिती दिली. गोव्यात विशेषत: समुद्र किना-यावर दारु पिऊन बाटल्या किना-यावरच फेकून देण्यात येतात. त्यामुळे कच-याची समस्या तर वाढतेच शिवाय हा कचरा पर्यावरणालाही घातक ठरतो. त्यामुळे सार्वजनिक जागेवर दारु पिण्यास बंदी आणण्याचा कायदा मार्चर्पयत गोव्यात लागू होणार असून अशाप्रकारे दारु पिणारे आढळल्यास त्यांच्यावर दंडनीय कारवाई केली जाईल असे ते म्हणाले.गोवा 2 ऑक्टोबर्पयत हागणदारी मुक्त करण्याची मुख्यमंत्र्यांनी या कार्यक्रमात पुन्हा एकदा घोषणा केली असून सध्या गोव्यात 72 हजार घरांना शौचालये नाहीत ही वस्तुस्थिती असल्याचे सांगितले. त्याशिवाय राज्याला याबाबतीत स्थलांतरीत कामगारांची समस्या सतावते. या परिस्थितीवर तत्काळ उपाय काढण्याची गरज असून ही शौचालये उभारण्यासाठी राज्य सरकार 300 कोटी रुपये खर्च करणार असे त्यांनी सांगितले.मडगावात स्वच्छ भारत अभियान कार्यक्रमाखाली मुख्यमंत्र्यांनी बुधवारी दक्षिण गोव्यातील पंचायत सदस्यांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, गोव्यात कित्येक ठिकाणी कामगारांना भाडय़ाने खोल्या देतात, मात्र या भाडेकरुंसाठी शौचालयांची सोय नसते. यामुळे आता पंचायत कायद्यातही बदल केला जाणार आहे. जे जमीन मालक आपल्या खोल्या भाडय़ाने देतात त्यांना शौचालयाचीही सोय करणे अनिवार्य असून जर ती सोय केली नाही तर अशा घर मालकांच्या विरोधात कायदेशीर कारवाई केली जाईल असे ते म्हणाले.गोव्यात कच-यावर प्रक्रिया करणारे एकूण चार प्रकल्प उभारले जाणार असून या प्रकल्पांतून तयार होणा-या बायो गॅसवर सार्वजनिक बसेस चालविल्या जाणार आहेत. या चार प्रकल्पांतून तयार होणा-या बायो गॅसवर गोव्यातील एक तृतीयांश सार्वजनिक वाहने चालू शकतील असा अंदाज त्यांनी व्यक्त केला.