पणजी : सार्वजनिक ठिकाणी जे पर्यटक मद्यपान करतात तसेच फुटपाथवर स्वयंपाक करतात, त्यांच्याविरुद्ध आता कारवाई होईल. कारण संबंधित कायद्याअंतर्गत आवश्यक ते नियम सरकारने तयार केले आहेत, असे उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांनी सांगितले.
आजगावकर यांनी पर्यटन उद्योगाशीसंबंधित विविध घटकांची मंगळवारी बैठक घेतली. गोवा टूर अॅण्ड ट्रॅव्हल संघटनेचे प्रतिनिधी तसेच मंत्री मायकल लोबो व पोलिस अधीक्षक बैठकीत सहभागी झाले. राज्यातील 35 टक्के गेस्ट हाऊस बेकायदा पद्धतीने चालतात. त्यांची नोंदणीच झालेली नाही व त्यामुळे पर्यटन खात्याला मोठय़ा प्रमाणात महसुलाला मुकावे लागते अशी तक्रार बैठकीत काहीजणांनी केली. येत्या 1 महिन्यात सर्वानी नोंदणी करून घ्यावी लागेल अन्यथा आम्ही त्यांना सिल ठोकण्याची कारवाई करू, असे उपमुख्यमंत्री आजगावकर यांनी बैठकीनंतर लोकमतला सांगितले. ओयोनेही याची दखल घ्यावी असे ते म्हणाले. पर्यटकांची संख्या वाढली आहे. तथापि, आम्हाला जास्त खर्च करणारे पर्यटक गोव्यात आलेले हवे आहेत. यापुढे चीन, पश्चीम युरोप व दक्षिण पूर्व आशियातून पर्यटक आलेले गोव्याला हवे आहेत, असे ते म्हणाले. गोव्याच्या पर्यटन खात्याला अलिकडेच तीन राष्ट्रीय पुरस्कार मिळाले. सनबर्नच्या चांगल्या आयोजनाबाबतही बैठकीत प्रत्येकाने समाधान व्यक्त केले. ड्रग्जविरुद्ध पोलिस कारवाई करत आहेत. बैठकीत लोबो यांनी ज्या सूचना केल्या, त्यांचाही विचार होईल, असे आजगावकर म्हणाले.
सार्वजनिक ठिकाणी मद्य पिणा:यांविरुद्ध कारवाई करण्यासाठी सरकारने कायदा केला पण नियम तयार नव्हते. आता नियम तयार झाल्याने अशा उपद्रवी पर्यटकांना अटक केली जाईल. उघडय़ावर स्वयंपाक करणा:या पर्यटकांनाही कारवाईस सामोरे जावे लागेल, असे आजगावकर म्हणाले.