लोकमत न्यूज नेटवर्क पणजी : पर्यटकांना वाहतूक नियम पाळावेच लागतील. जर रेन्ट अ कार किंवा बाइकचा अपघात होऊन जर त्यात कुणाचा मृत्यू झाला तर चालकासह कार मालकालाही जबाबदार धरून त्यालाही अटक करून तुरुंगात पाठवले जाईल, असा इशारा थेट मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल दिला.
दसऱ्यानिमित कदंबतर्फे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मंत्री माविन गुदिन्हो, कदंब महामंडळाचे अध्यक्ष उल्हास तुयेकर, व्यवस्थापक संचालक डेरीक नॅटो, सरव्यवस्थापक संजय घाटे, संचालक राजन सातार्डेकर उपस्थित होते. मद्यपान करून वाहून चालवणे खपवून घेतले जाणार नाही. वाहतूक नियमांचे उल्लंघन तर होत नाही ना हे पाहण्यासाठी वाहतूक पोलिस व आरटीओने कारवाई करावी, असेही त्यांनी सांगितले.
गोव्यात वाहतुकीसाठी आवश्यक त्या पायाभूत सुविधांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे प्रवासाची वेळ कमी होत आहे. मात्र, पायाभूत सुविधा वाढत असतानाच अपघातही वाढत आहेत. लोक वेगाने वाहने चालवत असल्याने दुचाकीचालकांचे नाहक बळी जात आहेत, हे थांबायला हवे. यासाठी वाहतूक नियमांचे पालन करावेच लागेल. मद्यपान करुन वाहन चालवणे खपवून घेतले जाणार नाही. पर्यटकांनीसुद्धा वाहतूक शिस्त पाळावी. यापुढे रेंट अ कार किंवा बाइकचा अपघात होऊन जर त्यात कुणाचा मृत्यू झाला तर चालकासह कार मालकालाही जबाबदार धरले जाईल. त्यालाही तुरुंगात पाठवण्याची तरतूद करण्यावर सरकारचा विचार आहे. असे त्यांनी स्पष्ट केले.
कदंब कर्मचाऱ्यांनी भिवपाची गरज ना!
माझी बस योजना सुरू केली म्हणून कदंब कर्मचाऱ्यांना सेवेतून कमी केले जाणार नाही. कर्मचाऱ्यांची जबाबदारी ही कदंबावर आहे. नागरिकांना चांगली वाहतूक सेवा मिळावी यासाठी ही योजना सुरू केली आहे. औद्योगिक वसाहतींमध्ये काम करणारे रात्रीच्या वेळी ड्यूटी संपवून दुचाकीने घरी जातात. अशावेळी अपघात होण्याची शक्यता असते. ती टाळण्यासाठी या कर्मचायांसाठी कदंब बससेवा सुरू करण्यावर भर असेल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
बसचे लोकेशन ट्रॅक होणार
कदंब बस कुठल्या मार्गावर आहे, त्याची वेळ कोणती हे ट्रॅक करणे प्रवाशांना शक्य होणार आहे. त्यासाठी कदंब महामंडळाने गोवा माइल्सशी करार केला आहे. तर, प्रवाशांना डिजिटल पेमेंट करणेही शक्य होणार आहे. तंत्रज्ञानाचा जास्तीच जास्त वापर कदंब करीत आहे. त्यामुळे महामंडळ नफ्यात येणार हे नक्की, असा विश्वास वाहतूक मंत्री माविन गुदिन्हो यांनी व्यक्त केला.