लोकमत न्यूज नेटवर्क पणजी : पावसाने दडी मारल्याने धरणांची स्थिती बिकट बनली आहे. त्यामुळे राज्यात जलदुष्काळाची ही चाहूल असल्याचे मानले जात आहे. ६ जुलैपर्यंत पाऊस लांबणीवर पडल्यास परिस्थिती गंभीर निर्माण होणार आहे. अंजुणे धरणात फक्त १५ दिवस पुरेल एवढेच पाणी आहे, त्यामुळे पाण्याची मोठ्या प्रमाणात टंचाई निर्माण होण्याचे सावट राज्यावर घोंघावत आहे.
सोमवारी धरणांमधील पाणीसाठा तपासला असता अंजुणे धरणात पाण्याची पातळी एकदमच खाली आल्याचे दिसून आले. या धरणात केवळ ३ टक्के पाणी राहिले आहे. पंचवाडी धरण गेल्या आठवड्यात कोरडे पडले होते. परंतु या धरण क्षेत्रात गेल्या चार-पाच दिवसात पावसाच्या हलक्या सरी झाल्याने आता ते २ टक्के भरले आहे.
साळावली धरण २१ टक्के भरलेले आहे. आमठाणे व चापोली धरण प्रत्येकी ४१ टक्के तर गावणे धरण ३६ टक्के भरलेले आहे. गोवा व महाराष्ट्राचा संयुक्त प्रकल्प असलेल्या तिळारी धरणात मात्र पुरेसा पाणीसाठा आहे. हे धरण ९६ टक्के भरलेले आहे.
अस्नोडा, चांदेल, ओपा जलशुद्धीकरण प्रकल्पांना धरणांमधून पाणीपुरवठा झाला नाही तर मोठा जलदुष्काळ येऊ शकतो. अस्नोडा प्रकल्पावर संपूर्ण बार्देश व डिचोली तालुक्यातील लोकांची पिण्याच्या पाण्यासाठी भिस्त आहे. पाणी कमी झाले की, आमठाणेहून पंपिंग करुन या प्रकल्पासाठी पाणी घेतले जाते. परंतु आमठाणे धरणातील जलाशयाची स्थितीच सध्या बिकट आहे. केवळ ४० दिवस पुरेल एवढेच पाणी या धरणात आहे.
पाणी शंभर दिवस पुरेल
जलस्रोत खात्याचे प्रमोद बदामी यांच्या अभियंता संपर्क साधला असता त्यांनी अंजुणे धरणात १५ ते २० दिवस पुरेल पाणी शिल्लक असल्याचे मान्य केले. परंतु त्याचबरोबर ते म्हणाले की, लोकांनी घाबरुन जाण्याचे कारण नाही. साळावली धरणात शंभर दिवस पुरेल एवढा पाणीसाठा आहे. आमठाणे धरणात ४० दिवस पुरेल एवढा तर तिळारी धरणात तब्बल तीन महिने म्हणजेच ९० दिवस पुरेल एवढे पाणी आहे.