लोकमत न्यूज नेटवर्कवास्को: दक्षिण गोव्यातील बायणा समुद्र कीनाऱ्यापासून काही अंतरावर खोल समुद्रात असलेल्या बेटा जवळील समुद्रात आंघोळ करताना २३ वर्षीय विशाल नायक याचा बुडून मृत्यू झाला. विशाल वॉटर र्स्पोट्स बोट नौकेवर कामगार म्हणून कामाला असून त्यांची नौका पर्यटकांना घेऊन बेटावर आल्यानंतर तो समुद्रात आंघोळ करण्यासाठी गेला असता तेथे त्याचा बुडून मृत्यू झाला.
हार्बर कोस्टल सेक्युरीटी पोलीस स्थानकाचे निरीक्षक प्रदीप वेळीप यांनी दिलेल्या माहितीनुसार रविवारी (दि.७) दुपारी २.३० च्या सुमारास ती घटना घडली. विशाल काम करणारी नौका पर्यटकांना घेऊन स्कूबा डायव्हींग इत्यादी वॉटर र्स्पोट्स करण्यासाठी बायणा किनाऱ्यापासून खोल समुद्रात असलेल्या बेटावर पोचली. तेथे नौका नांगरून पर्यटकांना वॉटर र्स्पोट्ससाठी नेल्यानंतर त्या नौकेवर कामगार म्हणून काम करणारा विशाल समुद्रात आंघोळीसाठी उतरला. पर्यटकांना वॉटर र्स्पोट्स करून त्यांना घेऊन नौकेवरील इतर कामगार नौकेजवळ पोचले असता त्यांना विशाल तेथे दिसून आला नाही. त्यामुळे त्यांनी त्याचा शोध घेण्यास सुरवात केली असता त्यांना तो समुद्राच्या पाण्यात तरंगत असल्याचे आढळले.
नौकेवर काम करणाऱ्या इतर कामगारांनी त्याला त्वरित पाण्यातून बाहेर काढून प्रथमोपचार देत पुढच्या उपचारासाठी चिखलीच्या उपजिल्हा इस्पितळात नेले. मात्र इस्पितळात पोचण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. बुडून मरण पावलेला विशाल नायक हा नेरुल येथे राहत असून तो मूळ मध्यप्रदेश येथील असल्याची माहीती पोलीस निरीक्षक प्रदीप वेळीप यांनी दिली. पोलीसांनी विशालच्या मृतदेहाचा पंचनामा करून तो मडगावच्या हॉस्पिसीयो इस्पितळाच्या शवागृहात पाठवला. सोमवारी (दि.८) त्याच्या मृतदेहावर शवचिकीत्सा करण्यात येणार असल्याची माहीती पोलीसांनी दिली. पोलीस निरीक्षक प्रदीप वेळीप यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास चालू आहे.