ऑनलाइन लोकमत
पणजी, दि. 22 - गोव्याच्या किनारपट्टी भागांमध्ये रात्री उशिरा होणाऱ्या पार्ट्यांमुळे लोकांना कर्णकर्कश संगीताचा त्रास होतो. शिवाय अशा पार्ट्यांमध्ये अंमली पदार्थांचा वापर होत असल्याच्या तक्रारी अनेकदा येतात. नवे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी अशा पार्ट्या बंद करण्याचा आदेश वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना दिला आहे.
अंमली पदार्थांचा वापर गोव्यात वाढू देऊ नका. अशा व्यापाराविरुद्ध कडक कारवाई करावी तसेच रात्री उशिरा पर्यटकांच्या सहभागाने ज्या पार्ट्या चालतात त्यात ड्रग्जचा वापर होऊ देऊ नका. त्या पार्ट्या बंद करा असा आदेश आपण दिल्याचे मुख्यमंत्री पर्रीकर यांनी बुधवारी विधानसभा अधिवेशनातील कामकाज संपल्यानंतर येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले. महिलांविरुद्ध
कसलेच गुन्हे मुळीच खपवून घेतले जाणार नाहीत. त्याविरुद्धही कठोर पाऊले उचलण्यास आपण पोलिसांना सांगितले आहे. तसेच गोव्यातील महामार्गांच्या बाजूने असलेली अतिक्रमणे हटविली जातील. यापुढे महामार्गांच्या बाजूने कुणालाच शहाळी विकू दिली जाणार नाहीत. भाजी विक्री तेवढी करता येईल असे मुख्यमंत्री म्हणाले.