लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : ड्रग्जच्या उपलब्धतेबाबत केलेले विधान अंगलट आल्यानंतर पर्यावरण तथा कायदामंत्री आलेक्स सिक्वेरा यांनी आता सारवासारव केली असून 'मी सगळीकडेच ड्रग्ज मिळतात, असे म्हटले होते. सर्वत्र म्हणजेच जगभरात सगळीकडेच असादेखील त्याचा अर्थ होतो', असा बचाव घेतला आहे.
स्वातंत्र्यदिनी, गुरुवारी मडगाव येथे जिल्हाधिकारी कार्यालयातील कार्यक्रमात विद्यार्थ्यांना संबोधताना मंत्री सिक्वेरा यांनी विद्यार्थ्यांना ड्रग्जपासून दूर राहण्याचे आवाहन केले होते. योगायोगाने सनबर्न इडीएम यंदा त्यांच्याच मतदारसंघात होत आहे, त्यामुळे कार्यक्रमानंतर स्वातंत्र्यदिनाच्या पत्रकारांनी चहापानाच्यावेळी त्यांना या विधानाची आठवण करून देत ड्रग्जसाठी कुप्रसिद्ध असलेले सनबर्न तुम्हाला कसा चालतो?, असा सवाल केला होता त्यावरही मंत्र्यांनी ड्रग्ज सर्वत्रच मिळतात, त्यासाठी सनबर्नची गरज असतेच असे नाही, असे विधान केले होते. त्यामुळे खळबळ उडाली. त्यानंतर आता मंत्र्यांनी आपल्याला ड्रग्ज गोव्यात मिळतात, असे म्हणायचे नव्हते तर जगभरात सर्वत्र असे म्हणायचे होते, अशी सारवासारव केली आहे.
सिक्वेरा म्हणतात...
आपल्याला ड्रग्ज गोव्यात मिळतात, असे म्हणायचे नव्हते तर जगभरात सर्वत्र ड्रग्ज मिळतातच, असे म्हणायचे होते, असे सांगत मंत्र्यांनी सारवासारव केली.
भाजपमध्येही चर्चा
मंत्र्यांच्या या बेजबाबदार विधानाची सत्ताधारी भाजप नेत्यांमध्येही चर्चा सुरू झाली. पक्षाच्या स्तरावरही चर्चा झाल्याचे लक्षात आल्यानंतर, काल शुक्रवारी मंत्र्यांनी प्रसार माध्यमांसमोर येत, आपल्याला तसे म्हणायचे नव्हते, अशी सारवासारव केली. गोव्यात सगळीकडे नव्हे तर जगभरात ड्रग्ज मिळते, त्यासाठी सनबर्नच लागत नाही असे मी बोललो होतो असे सिक्वेरा यांनी सांगितले.
टीकेची झोड...
'ड्रग्ज सर्वत्र मिळते', या सिक्चेरा यांच्या विधानाने राज्यात खळबळ उडाली. त्यांच्या या विधानाने सरकारच्या गृह खात्याचे अपयश उघड होते, अशी टीका काँग्रेसने झाली आहे.
काँग्रेस, आपची टीका
दरम्यान, काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष सुनील कवठणकर यांनी मंत्री आलेक्स सिक्वेरा यांनी अमली पदार्थांबाबत केलेल्या विधानाची दखल घ्यावी आणि यासंदर्भात सखोल तपास करावा अशी मागणी केली आहे. कवठणकर यांनी याबाबत अमली पदार्थविरोधी विभागाला (एएनसी) याबाबत निवेदन दिले. विभागाने तातडीने गोव्यातील ड्रग्जचा शोध घ्यावा आणि संबंधितांवर कारवाई करावी असे ते म्हणाले. दरम्यान, आपचे आमदार • वेंनी व्हिएगश यांनी सिक्वेरा यांच्यावर जोरदार टीका केली. गोव्यात अमली पदार्थ सर्वत्र उपलब्ध आहेत. मग त्यावर नियंत्रण ठेवण्याचे ज्यांचे काम आहे, त्यांना बदलण्याची गरज आहे. त्याची सुरुवात तुमच्यापासून करायला हवी अशी टीका वेंझी यांनी केली.