पणजी: पर्यटन हंगाम सुरू होण्यापूर्वी अत्यंत किरकोळ प्रमाणात ड्रग्सची विक्री होत होती, परंतु पर्यटन हंगाम सुरू झाल्यानंतर हे प्रमाण अनेक पटींने वाढले आहे. दहा छाप्यात जेवढा अंमली पदार्थ सापडत नव्हता तेव्हा तेवढा अंमली पदार्थ एकाच छाप्यात सापडवा तसा महिनाभरात एक कोटी रुपयांहून अधिक ड्रग्स पकडणारा महिना ठरला. डिसेंबर महिना हा गोवा पोलिसांसाठी अंमली पदार्थांचा पीक आणणारा महिना ठरावा असा महिना ठरला. जिल्हा पोलीस आणि अंमली पदार्थ विरोधी विभागाकडून या महिन्यात अनेक छापे टाकण्यात आले आणि मोठ्या प्रमाणावर अंमली पदार्थ जप्त करण्यात आला. देशी तसेच विदेशी ड्रग्स एजंटना पकडण्यात आले. १२ डिसेंबर रोजी पेडणे येथे सर्वात मोठ्या प्रमाणावर ड्रग्सचा साठा जप्त करण्यात आला. एकूण ६४ लाख रुपये किंमतीचे एल एसडी द्रव्य जप्त करण्यात आले. १७ डिसेंबर रोजी म्हापसा येथे एकूण १८ लाख रुपये किंमतीचा ६ किलो चरस पकडण्यात आला. २१ रोजी चार लाख रुपयांचा अंमली पदाथ कांदोळी येथे तर २२ रोजी हरमल येथे ८ लाख रुपये किंमतीचा २.७ किलो चरस पकडण्यात आला. या शिवाय कळंगुट पोलिसांनीही अनेक छापे टाकून एकावेळी ३ लाखापासून १० लाख रुपयांचा अंमली पदार्थ जप्त केला आहे. गोव्यात येणारा बहुतेक अंमली पदार्थ हा नेपाळमार्गे आणला जात असल्याचे तपासातून आढळून आले आहे. एका ड्रग्स एजंटला पकडल्यानंतर त्याची चौकशी होऊन ड्रग्स डिलरच्या साखळीचा पत्ता लागेल अशी अपेक्षा असते. परंतु तसे सहसा होत नाही. पकडला गेलेला माणूस आपल्या वरच्या साखळीची माहिती कशीच देत नसतो. आपल्याला त्यापुढे काहीच ठाऊक नाही असेच त्यांचे म्हणणे असते. त्यातही पकडला गेलेला नायजेरियन नागरीक असला तर ते तोंडही उघडत नाहीत अशी माहिती एका पोलीस अधिका-याकडून देण्यात आली. गोव्यात येणारा एकूण अंमली पदार्थ आणि पकडला जाणारा अंमली पदार्थ यात तफावत असते का? पोलिसांना गुंगारा देत मोठ्या प्रमाणावर अंमली पदार्थांचे व्यवहार आणि सेवन होत आहे काय? संघटित असलेली अंमली पदार्थ जगताची लॉबी पोलिसांपेक्षा वरचढ ठरत आहे काय? असेही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या विषयी वरिष्ठ पोलीस अधिका-याने गोव्यात अंमली पदार्थंच्या व्यवहारावर वचक ठेवण्यास यश मिळाल्याचे म्हटले आहे. अंमली पदार्थाविरोधीच्या कारवाईत पोलिसांची मदार असते ती खब-यांवर. परंतु सध्या खब-यांचाच दुष्काळ असल्यामुळे पोलिसांसमोर अव्हान ठाकले आहे.
डिसेंबर ठरला गोवा पोलिसांसाठी ड्रग्सचा महिना, एक कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2017 8:53 PM