म्हापसा : राज्यातील पर्यटन हंगाम सुरू झाल्यानंतर अमली पदार्थाच्या व्यवहारात बरीच वाढ झाली आहे. पर्यटकांना खास करुन विदेशी पर्यटकांना केंद्रस्थानी करुन चरस, गांजाची जागा आता कोकेन, एलएसडी सारख्या उच्च प्रतीच्या अमली पदार्थाने घेतली आहे. पहिल्या तीन दिवसात पोलिसांनी केलेल्या वेगवेगळ्या कारवाईत सुमारे १५ लाख रुपये किंमतीचा अमली पदार्थाचा साठा जप्त केला आहे. यातील १३ लाख रुपये किंमतीचे अमली पदार्थ केवळ किनारी भागात केलेल्या कारवाईतून जप्त करण्यात आले आहेत.
पोलीस खात्याच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने (एएनसी) शापोरा, हणजूण भागात केलेल्या दोन दिवसातील दोन वेगवेगळ्या कारवाईत ११ लाख रुपये किंमतीचा अमली पदार्थाचा साठा जप्त केला. गुरुवारी हणजूण भागात या पथकाने केलेल्या कारवाई साडेपाच लाख रुपये किंमतीचे अमली पदार्थ जप्त केले. त्याच दिवशी कळंगुट पोलिसांनी गुजराती युवकाकडून सव्वालाख रुपये किंमतीचा चरस तसेच कोकेन जप्त करुन दोन दिवसात १३ लाख रुपये किंमतीचा अमली पदार्थाचा साठा किनारी भागातून जप्त केला. तसेच दक्षिण गोव्यातील मायणा-कुडतरी पोलिसांनी सुमारे चार हजार रुपये किंमतीचा ४२ ग्राम चरस जप्त करुन एकाला ताब्यात घेण्याची कारवाई केली होती.
शुक्रवारी शापोरा या किनाऱ्यानजिक एएनसीने केलेल्या दुसऱ्या कारवाईत ५ लाख ६५ हजार ६०० रुपये किंमतीचा अमली पदार्थाचा साठा जप्त केला होता. त्यात हिमाचल प्रदेशातील मोहनलाल या नागरिकाला अटक केली होती. तर मडगाव पोलिसांनी केलेल्या कारवाईत १ लाख ७२ हजार रुपये किंमतीच्या गांजासहित मूळ कर्नाटकातील मंजुनाथ बाळेकी याला अटक केली होती. किनारी भागात पकडण्यात आलेल्या अमली पदार्थाला हिमाचल प्रदेशातील कनेक्शन देण्यात येत असले तरी पर्यटन हंगाम सुरू झाल्यानंतर दोन दिवसात मात्र अमली पदार्थाच्या व्यवसायात बरीच वाढ झाली आहे.