किशोर कुबल/पणजीपणजी : परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या आदेशावरुन पारपत्र कार्यालयाने पोर्तुगालमध्ये जन्म नोंदणी म्हणजे त्या राष्ट्राचे नागरिकत्त्व स्विकारल्यासारखेच असल्याचे धोरण अवलंबिल्याने पोर्तुगालमध्ये जन्म नोंदणी केलेले गोव्यातील अनेक ज्येष्ठ नागरिक चिंतेत आहेत. कारण त्या राष्ट्राचे नागरिक गणले गेल्यास मतदानापासून सर्व सवलती गमवाव्या लागतील.
परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने अलिकडेच एक आदेश काढला असून ज्यात असे म्हटले आहे की कोणतीही व्यक्ती संबंधित देशात जन्म नोंदणी केल्याच्या दिवसापासून त्या देशाची नागरिक ठरते. गोव्यात ४५० वर्षांहून अधिक काळ पोर्तुगिजांची सत्ता होते. १९६१ साली गोवा मुक्त झाला. त्याआधी गोव्यात जन्मलेल्या प्रत्येकाची पोर्तुगालमध्ये जन्म नोंदणी झालेली आहे. ज्यांनी पोर्तुगालमध्ये आपला जन्म नोंदविला आहे किंवा पोर्तुगीज पासपोर्ट घेतला आहे ते पारपत्र विभागाच्या धोरणामुळे चिंतेत सापडले आहेत. गोव्यातील हजारो लोकांचे जन्म लिस्बनमध्ये नोंदणीकृत आहेत. गोवा ही पोर्तुगीज वसाहत असल्याने, पोर्तुगीज सरकारने १९६१ पूर्वी राज्यात जन्मलेल्यांना पोर्तुगीज नागरिक बनण्याची संधी दिली होती. पोर्तुगालमध्ये जन्म नोंदवलेले असे अनेकजण आज ६० पेक्षा अधिक वर्षे वयाचे आहेत. त्यांची मुले मोठी झाली आहेत. काहीजणांचे मुले पोर्तुगीज पासपोर्ट मिळवून युरोपियन महासंघाच्या अंतर्गत येणाय्रा राष्ट्रांमध्ये नोकरी, व्यवसाय करीत आहेत.गोव्यात अनेक राजकारण्यांच्या बाबतीतही याआधी पोर्तुगिज नागरिकत्वाचा प्रश्न उपस्थित होऊन प्रकरणे न्यायालयापर्यंत गेलेली आहेत.
सरकार आणि न्यायालयांनी उपाय काढावा : आयरिश रॉड्रिग्स
दरम्यान, स्वत: पोर्तुगीज नागरिकत्त्व स्वीकारलेले सामाजिक कार्यकर्ते ॲड. आयरिश रॉड्रिग्स यांच्या मतें सरकार आणि न्यायालयांनी असा उपाय शोधण्याची गरज आहे ज्यामुळे पोर्तुगीज आणि इतर राष्ट्रीयत्व मिळविलेल्या अनेकांना भेडसावणाऱ्या समस्येचे निराकरण होऊ शकेल. अनेकांना जन्मामुळे आणि ऐतिहासिक कारणांमुळे पोर्तुगिज नागरिकत्त्व स्विकारावे लागले आहे.आयरिश म्हणाले कि,‘ केंद्र सरकारने लोकांना दुहेरी नागरिकत्व किंवा भारतीय नागरिकत्वाची परवानगी देणे शहाणपणाचे ठरेल कारण त्यांच्याकडे परदेशी नागरिकत्व असू शकते आणि तरीही ते मातृभूमीशी जवळचे संबंध ठेवू शकतात. जागतिक लोकसंख्येच्या पुनरावलोकनानुसार, जगभरातील सर्व देशांपैकी ४९ टक्के देश दुहेरी नागरिकत्वाला परवानगी देतात. म्हणजेच एखादी व्यक्ती एकापेक्षा जास्त देशांची नागरिक असू शकते. आपण अशा युगात जगत आहोत जेथे जग हे एक जागतिक गाव आहे.’