पणजी - गंभीर आजारामुळे आपल्या निवासस्थानीच राहणारे व गेले तीन महिने सचिवालय तथा मंत्रलयापासून दूर राहिलेले मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे अचानक सक्रियतेमुळे गोव्यात पुन्हा वेगळ्या अर्थाने चर्चेत येऊ लागले आहेत. पर्रीकर मंत्रिमंडळातील मंत्र्यांना व काही आजी-माजी भाजपा आमदारांनाही ही सक्रियता म्हणजे लोकसभा निवडणुकीसोबत गोवा विधानसभेची मध्यावधी निवडणूक घेण्याची तर तयारी नव्हे ना अशी शंका जागी आली आहे.
लोकसभा निवडणुकीसोबत केंद्रीय भाजपा महाराष्ट्र, हरयाणा अशा दोन-तीन राज्यांत विधानसभा निवडणुका घेण्याचा विचार करत असल्याचे वृत्त राष्ट्रीय स्तरावरून आहे. गोव्यात भाजपाकडे स्पष्ट बहुमत नसल्याने व सरकारचा सगळाच डोलारा गोवा फॉरवर्ड, महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष आणि अपक्ष आमदारांवर अवलंबून असल्याने गोवा विधानसभेच्याही लोकसभेसोबत निवडणुका घेतल्या जाऊ शकतात अशी चर्चा आतापर्यंत राजकीय विश्लेषकांमध्ये सुरू होती व आहे. मात्र आता प्रथमच मंत्र्यांमध्येही अशा प्रकारची शंका जागी झाली आहे. कारण पर्रीकर यांनी आपल्या खासगी निवासस्थानी सरकारी अधिकारी व मंत्र्यांच्या बैठका घेण्याचे सत्र आरंभिले आहे.
दिवसाला तीन बैठका पर्रीकर घेऊ लागले आहेत. ते घराबाहेर पडू शकत नाहीत. त्यांच्या नाकामध्ये टय़ुब घातलेली आहे. ते पातळ पदार्थच आहारात घेऊ शकतात. त्यांना आधार घेऊन चालावे लागते. मात्र गेल्या आठवड्यात त्यांनी अचानक गोवा सरकारने बांधलेल्या व यापुढे उद्घाटन होणार असलेल्या तिसऱ्या मांडवी पुलावर जाऊन कामाची पाहणी करण्याची इच्छा व्यक्त केली व अधिकाऱ्यांनी त्यांना तिसऱ्या पुलावर नेले. त्याविषयीचे फोटो सर्वत्र झळकले. पर्रीकर पुलावर येणार असल्याची कल्पना मात्र प्रसार माध्यमांना मुद्दाम दिली गेली नव्हती. काश्मिरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला व इतरांनी याविषयी सूचक असे ट्वीट केले व पर्रीकर यांनी विश्रांती घ्यावी असा सल्ला दिला. पर्रीकर हे पूर्वी नाकात टय़ुब असताना फोटो काढून घेत नव्हते. तथापि, आता तशाही स्थितीत ते फोटो काढून घेतात व अनेक अधिकाऱ्यांना घरी बोलावून त्यांच्याशी संवाद साधतात.
पर्रीकर यांनी आपल्या निवासस्थानी नुकतीच मंत्रिमंडळाची बैठक घेतली. पर्रीकर व्हील चेअरवर बसलेले असताना असे त्या बैठकीत सहभागी झालेल्या बहुतेक मंत्र्यांनी लोकमतला सांगितले. पर्रीकर फाईल्स वाचतात. स्वत: फाईल्सवर सहीही करतात व ते संवादही साधतात. मात्र ते फोनवर बोलणे टाळतात. सरकामधील ज्येष्ठ मंत्री सुदिन ढवळीकर तसेच मंत्री रोहन खंवटे हेही नुकतेच पर्रीकर यांना स्वतंत्रपणे भेटले. मंत्री खंवटे यांनी पर्रीकर यांच्यासोबत काढलेला नवा फोटो हा पर्रीकर किती थकलेले आहेत हे दाखवून देते.
पर्रीकर केवळ फोटोपुरते सक्रिय झालेले आहेत, असे राजकीय विश्लेषकांना वाटते. मात्र पर्रीकर यांची ही सक्रियता म्हणजे गोवा विधानसभेच्या मध्यावधी निवडणुकीची तयारी असल्याचे काही मंत्र्यांना वाटू लागले आहे. गोव्यातील सत्ताधारी आघाडीतील घटक पक्ष सतर्क झाले आहेत. गोव्याचे माजी राज्य निवडणूक आयुक्त तथा राजकीय व सामाजिक विश्लेषक प्रभाकर तिंबले लोकमतशी बोलताना म्हणाले, की पर्रीकर सक्रिय झालेले नाहीत, फक्त प्रशासन ठप्प झाल्याची जोरदार टीका प्रसार माध्यमे व लोक करू लागल्याने ते थोडी धडपड करतात. त्यांची आताची धडपड दाखवून देते की, येत्या महिन्यात विधानसभा अधिवेशनार्पयत विद्यमान सरकार चालविले जाईल व मग गोव्यात राष्ट्रपती राजवट लागू केली जाईल.