पणजी : गोव्यातील दाबोळी विमानतळाच्या धावपट्टीवर भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढला असून बुधवारी एका घटनेत असाच भटक्या कुत्र्यामुळे इंडिगो विमानाचे उड्डाण वैमानिकाला थांबवावं लागलं. मुंबईकडे जायला निघालेल्या इंडिगोच्या 6 इ 458 विमानासमोर संध्याकाळी ५.३0 च्या सुमारास हा प्रकार घडला. वैमानिकाला विमानावर नियंत्रण ठेवण्यासाठी कसरत करावी लागली.
वैमानिकाने विमान थांबवलं पण खबरदारी म्हणून नंतर ते विमान पार्किंग तळावर आणून काही टायर बदलावे लागले. विमानतळ सूत्रांनी या वृत्तास दुजोरा दिला. विमानात सुमारे १00 प्रवासी होते. सुदैवाने कोणतीही दुर्घटना न घडल्याने सर्वजण बचावले. या घटनेमुळे अडीच तास विलंबाने विमानाने उड्डाण केलं
वैमानिकाने ग्राउंड स्टाफ, अभियंते तसेच प्रवाशांना या गोष्टीची कल्पना दिली. बुधवारी संध्याकाळी ५.३0 च्या सुमारास विमान उ्डडाण करायला सज्ज असताना धावपट्टीवर अचानक कुत्रा आडवा आल्याने वैमानिकाला अचानक ब्रेक लावावे लागले. त्यामुळे विमान हेलकावे खात उजवीकडे आणि डाविकडे धावू लागले. परंतु अखेर वैमानिकाने त्यावर नियंत्रण आणले. टायर बदलण्याच्या किरकोळ दुरुस्तीनंतर अभियंत्यांनी विमानाची पुन्हा एकदा तपासणी केली आणि नंतरच ते मुंबईकडे रवाना केलं. रात्री ८ वाजून ८ मिनिटांनी या विमानाने मुंबईकडे झेप घेतली आणि ९.३८ वाजता ते मुंबईला उतरले.
दाबोळी विमानतळाच्या परिसरात भटकी कुत्री, गाई, म्हशी आदी जनावरांचा वावर वाढलेला आहे. उघड्यावर कचरा टाकला जात असल्याने घारी, तसेच अन्य पक्षीही आकाशात घिरट्या घालत असतात. अनेकदा हे पक्षीही वैमानिकांना विमान उड्डाणाच्या वेळी तसंच लँडिंगच्यावेळी त्रासदायक ठरतात. भटकी जनावरे विमानतळाच्या अवारात किंवा धावपट्टीवर येऊ नयेत यासाठी सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आल्याचा दावा विमानतळ प्रधिकरणाच्या अधिकाऱ्याकडून केला जातो परंतु अशा घटना नेहमीच्याच बनल्या आहेत.
दरम्यान, दाबोळी मतदारसंघाचे आमदार तथा विद्यमान पंचायतमंत्री मॉविन गुदिन्हो यांनी विरोधात असताना विमानतळ परिसरातील कचरा तसेच भटक्या जनावरांच्या प्रश्नावर वेळोवेळी विधानसबेत आवाज उठविला आहे. त्यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, केवळ दाबोळी पंचायतीलाच नव्हे तर राज्यातील सर्व ग्रामपंचायतींना कचरा विल्हेवाटीबाबत योग्य ती पावले उचलण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. मॉविन म्हणाले की, दाबोळी, सांकवाळ, चिखली, चिकोळणा, बोगमाळो, वास्को आदी भागातील लोकसंख्या ३0 हजार होती ती आज १ लाखापेक्षा अधिक झालेली आहे.