पणजी - गोव्यात खराब हवामानामुळे निम्म्याहून अधिक ट्रॉलर्स समुद्रात जाऊ शकलेले नाहीत. मच्छिमारीचा हंगाम संपण्याआधीच ट्रॉलर्स किनाऱ्यावर आणून नांगरावे लागले आहेत. मालिम जेटीवर हे चित्र दिसत आहे. तसेच यामुळे बाजारात मासळीची आवक मोठ्या प्रमाणात घटली असून दर वाढलेले आहेत.
राज्यातील सर्वात मोठी मच्छिमारी जेटी असलेल्या मालिम जेटीवर गेला आठवडाभर ट्रॉलर्स नांगरुन ठेवलेले दिसून आले. या जेटीवर सुमारे ३२५ ट्रॉलर्स आहेत. मात्र ५0 टक्के ट्रॉलर्सच मच्छिमारीसाठी गेले आहेत. मालिम जेटीवरील मांडवी फिशरमेन्स को. ऑपरेटिव्ह सोसायटीचे माजी अध्यक्ष तथा ट्रॉलरमालक सीताकांत परब म्हणाले की, ‘फनी’ वादळाने ओडिशा किनाऱ्याला धडक दिल्यानंतर खराब हवामानामुळे ट्रॉलर्स मासेमारीसाठी गेलेले नाहीत. जे अवघे काही गेले होते तेही परत आले आहेत.
मासेमारीवर परिणाम झाल्याने मासळीचे दरही वाढलेले आहेत. जेटीवर मध्यम आकाराचे बांगडे १२५ रुपये किलोने विकले जातात. बाजारात दर आणखी जास्त आहेत. लहान आकाराच्या सुरमई ६00 रुपये किलोने जेटीवर विकले जात आहेत. सफेद पापलेटचा दर १000 रुपये किलोवर पोचला आहे. सौंदाळे ३00 रुपये किलो झाले आहेत. बाजारातही मासळीची आवक कमी झालेली आहे.
या महिनाअखेरपर्यंतच मासेमारी करायला मिळते. १ जूनपासून पावसाळ्यात दोन महिने मासेमारीवर बंदी असते. मात्र निसर्गाच्या अवकृपेमुळे ही बंदी आतापासूनच लागू झालेली आहे. ट्रॉलर नांगरुन ठेवण्या व्यतिरिक्त पर्याय राहिलेला नसल्याचे मालिम येथील अन्य एका ट्रॉलर मालकाने सांगितले. शेजारी कर्नाटक, महाराष्ट्राबरोबरच छत्तीसगड, ओडिशा येथील खलाशीही गोव्यातील ट्रॉलर्सवर मोठ्या प्रमाणात काम करत असतात. पावसाळ्यात मच्छिमारी बंद असल्याने ते गावी जातात तेथे शेतीची कामे करतात. ही कामे आटोपल्यानंतरच ते गोव्यात परतत येतात. गोव्यात ट्रॉलरवर काम करण्यासाठी खलाशी मिळत नसल्याने या कामगारांवरच ट्रॉलर मालकांना सर्वस्वी अवलंबून रहावे लागते. मोठ्या ट्रॉलरवर साधारणपणे ४0 तर छोट्या ट्रॉलरवर १५ ते २0 खलाशी लागतात, अशी माहिती या ट्रॉलर मालकाने दिली आहे.