मडगाव : सीआरझेड नियंत्रणाच्या कात्रीत सापडलेल्या मच्छीमार तसेच पर्यटन व्यावसायिक यांना दिलासा देणारा सर्वमान्य तोडगा काढण्याचे संकेत केंद्रीय पर्यावरण राज्यमंत्री अनिल दवे यांनी शुक्रवारी ब्रिक्स पर्यावरण परिषदेच्यावेळी पत्रकारांशी बोलताना दिले. ते म्हणाले, मच्छीमार समुद्रकिनाऱ्यावर मागची कित्येक शतके राहत आहेत. सीआरझेड कायदा त्यांना जाचक ठरत आहे. दुसऱ्या बाजूने किनारपट्टी भागातील पर्यटन व्यावसायिकांनाही समस्यांना सामोरे जावे लागते. भविष्यात या दोघांनाही दिलासा देणारे बदल या कायद्यात होतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. नद्यांचे राष्ट्रीयीकरण करताना स्थानिक मच्छीमारांना विश्वासात घेण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. दोन दिवसांच्या या परिषदेसाठी आलेल्या दवे यांनी स्थानिक पर्यावरणमंत्री राजेंद्र आर्लेकर यांच्याशी सीआरझेड विषयांसह अनेक विषयांसंदर्भात चर्चा केली. त्यात खासगी मालकीच्या वन क्षेत्राचाही समावेश होता. या घटकालाही दिलासा मिळेल, असे ते म्हणाले. (प्रतिनिधी)
सीआरझेडच्या कचाट्यातून मच्छीमारांना बाहेर काढू : दवे
By admin | Published: September 17, 2016 2:15 AM