पणजी : 1994 सालापासून सातत्याने पणजी मतदारसंघातून निवडून आलेल्या व मुख्यमंत्री, संरक्षण मंत्री म्हणून काम केलेल्या मनोहर पर्रीकर यांच्या निधनामुळे पणजीत गुरुवारी रंगपंचमीही साजरी झाली नाही. एरव्ही रंगपंचमीला पूर्ण पणजी रंगाने न्हाऊन निघत होती पण यावेळी पणजी शहरातील वातावरणात सगळीकडे उदासीनतेचा रंग भरून राहिला आहे, असा अनुभव आला.
पर्रीकर यांचे नुकतेच निधन झाल्यानंतर सात दिवसांचा दुखवटा सरकारने जाहीर केला. सात दिवस अजून पूर्ण झालेले नाहीत. गोव्यातील विधानसभेच्या तीन मतदारसंघांमध्ये पोटनिवडणुका होत आहेत. निवडणुकीचा प्रचारही उमेदवारांकडून तूर्त स्थगित ठेवला गेला आहे. सरकारने सगळेच कार्यक्रम रद्द केले. सरकारी पातळीवरून होणा-या शिमगोत्सवाच्या मिरवणुकाही पुढे ढकलल्या गेल्या. दरवर्षी पणजीत रंगपंचमीला पूर्ण शहरात मोठा उत्साह असायचा. आल्तिनो, पाटो कॉलनी, पणजी मार्केट, सांतइनेज, कांपाल, बोक द व्हाक, कुंडईकरनगर, मळा, मिरामार येथील परिसरातील सगळे लोक आपआपल्या घरातून बाहेर येऊन रंगपंचमी खेळायचे. पणजीतील मुख्य अशा आझाद मैदानावर तर मोठ्या उद्योजकांपासून सामान्य व्यक्तीपासून सगळेजण एकमेकाला रंग लावत रंगपंचमी साजरी करायचे व मग अनेक जण मिरामारच्या समुद्रात जाऊन आंघोळ करून यायचे. 94 सालापासून मनोहर पर्रीकर यांनी दरवर्षी या रंगपंचमीमध्ये भाग घेतला. देशाचे संरक्षणमंत्री म्हणून जबाबदारी असतानाही ते रंगपंचमीला पणजीवासीयांच्या उत्साहात सहभागी झाले होते. मात्र यावेळी प्रथमच पणजीचा नूरच बदलल्याचे दिसून आले. पणजीवासीयांमध्ये दु:खाची तीव्र भावना आहे. यामुळे रंगपंचमी साजरी झाली नाही. अवघ्याच युवकांनी रंगपंचमी केली, पण फार छोट्या प्रमाणात जे परप्रांतीय मजूर पणजीच्या परिसरात राहतात, त्यांनीच तेवढी रंगपंचमी साजरी केली. अन्यथा पूर्ण शहरात उदासीनता आढळून आली.