पणजी, दि. 6 - किना-यांवर मद्यप्राशन करून दंगामस्ती करणा-या तसेच धोक्याचा इशारा देऊनही समुद्रात उतरणा-या पर्यटकांवर कारवाईसाठी कायदा करणे शक्य आहे का, याची चाचपणी गोव्याच्या पर्यटनमंत्र्यांनी सुरू केली आहे. शॅकमध्ये यापुढे बियर तसेच अन्य मद्यासाठी काचेच्या बाटल्यांचा वापर करू नये, काचेचे ग्लास वापरू नयेत, अशी अट नव्या मोसमासाठी शॅकवाटप करताना घातली जाणार आहे.गेल्या काही दिवसात पर्यटकांचे गोव्याच्या किना-यांवर बुडून मरण पाण्याचे प्रमाण वाढल्याने मंत्री बाबू आजगावकर यांनी बुधवारी दृष्टी लाइफ सेव्हिंग जीवरक्षक कंपनीचे अधिकारी, किनारी पोलीस, आयआरबी जवान तसेच पर्यटन खात्याच्या वरिष्ठ अधिका-यांची बैठक घेतली. या दुर्घटना कशा काय घडल्या याची माहिती करून घेतली आणि सर्व यंत्रणांना अधिक सतर्क राहण्यास बजावण्यात आले.किना-यांवर दारू पिऊन धिंगाणा घालणा-या पर्यटकांवर कारवाईसाठी कायदा नाही. त्यांना तुरुंगात टाकता येत नाही, याकडे मंत्र्यांचे लक्ष वेधण्यात आले असता या दंगामस्तीला आळा घालण्यासाठी कायदा करता येईल का याचा अभ्यास करण्याचे निर्देश त्यांनी संबंधित अधिका-यांना दिले. गेल्या चार-पाच दिवसांत किना-यांवर पर्यटक बुडून मृत्यू पावल्याच्या ज्या दोन-तीन घटना घडल्या त्याविषयी मंत्र्यांनी जाणून घेतले. या प्रतिनिधीशी बोलताना मंत्री आजगावकर म्हणाले की, एक घटना मध्यरात्री 12.30 वाजता घडली होती. तर दुसरी रात्री 8 वाजता घडली. सूर्यास्तानंतर समुद्रस्नानास मनाई आहे. गोव्यात जीवरक्षकाचे काम करणा-या दृष्टी लाइफ सेव्हिंग कंपनीच्या जीपगाड्या सूर्यास्ताच्यावेळी किना-यावर फिरून इशारा देत असतात. परंतु ब-याचदा नशाबाजी केलेले पर्यटक तो धुडकावून समुद्रात उतरतात. यापुढे असे प्रकार गंभीरपणे घेतले जातील.
गोव्याच्या किना-यांवर मद्यप्राशन करून दंगामस्ती केल्यास होणार कठोर कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: September 06, 2017 5:45 PM