पणजी : काँग्रेसमधील एक गट फुटून भाजपशी संधान बांधील अशा प्रकारची चर्चा अधूनमधून सुरू असतानाच आता चक्क राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार चर्चिल आलेमाव यांनी भाजपसोबत उघडपणे मैत्री केल्यामुळे सत्ताधारी भाजपप्रणीत आघाडीतील घटक पक्ष व काही अपक्षही थोडे चक्रावले आहेत. त्यांच्यात चुळबूळ सुरू झाली आहे. चर्चिलमुळे आपले महत्त्व कमी होणार तर नाही ना असा प्रश्न काही मंत्री, आमदारांच्या मनात डोकावू लागला आहे.आलेमाव हे राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीवेळी आणि राज्यसभा निवडणुकीवेळीही एनडीएच्या उमेदवाराला मत देतील हे आता स्पष्ट झाले आहे. आलेमाव यांनी अधिकृतरित्या तसे उघड केलेले नसले तरी, एनडीएचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार रामनाथ कोविंद यांच्या बोगमाळो येथील बैठकीला उपस्थित राहून आलेमाव यांनी सर्व काही सूचित केले आहे. गोवा फॉरवर्ड आणि मगोपच्या काही मंत्र्यांना आलेमाव यांचे दर्शन देखील खपत नाही. काहीजणांशी आलेमाव यांचे राजकीय वितुष्ट आहे. मात्र, मुख्यमंत्री पर्रीकर यांनी आलेमाव यांना स्वत:च्या बाजूने ओढल्याने व चर्चिलची भाजपशी उघड मैत्री सुरू झाल्यामुळे गोवा फॉरवर्ड, मगोप आणि काही अपक्षांमध्येही अस्वस्थतेची भावना निर्माण होऊ लागली आहे. काही मंत्र्यांनी नाव गुप्त ठेवण्याच्या अटीवर या प्रतिनिधीकडे भावना व्यक्त केल्या. चर्चिल आलेमाव हे शनिवारी बैठकीसाठी येतील व त्यांच्यासोबत आम्हाला फोटो काढावा लागेल याची आम्हाला कल्पनाही नव्हती, असे एका आमदाराने सांगितले.सत्ताधारी आघाडीतील घटक पक्षांनी जर यापुढील काळात जास्त कुरबुरी केल्या तर काँग्रेसचे काही आमदारही फोडून ते आपल्याबाजूने आणण्याची तयारी भाजपने ठेवल्याची माहिती मिळाली. भाजपने ब्लॅकमेलिंगचे राजकारण खपवून घ्यायचे नाही असे ठरविल्यामुळेच राज्यसभा निवडणुकीसाठी विनय तेंडुलकर यांना उमेदवार निश्चित करताना भाजपने घटक पक्षांना व अपक्षांना काही विचारले देखील नाही. चर्चिल आलेमाव हे कोणत्याही विकास कामाचा प्रस्ताव घेऊन आले तर मुख्यमंत्री तो मंजूर करतात हे भाजपच्या व घटक पक्षांच्या आमदारांच्याही लक्षात आलेले आहे. लुईस बर्जर लाच प्रकरणात आलेमाव गजाआड झाले होते, त्यावेळी लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारच अधिकारावर होते. आलेमाव यांनी नव्या भाजपप्रणीत आघाडी सरकारशी मैत्री केल्यानंतर सरकारमधील काही ख्रिस्ती धर्मीय आमदारांच्या भुवयाही आश्चर्याने उंचावल्या गेल्या आहेत. मंत्री माविन गुदिन्हो यांचे तर अजूनही चर्चिलशी पटत नाही.
चर्चिलच्या भाजप मैत्रीमुळे घटक पक्षही चक्रावले
By admin | Published: July 16, 2017 2:29 AM