पणजी : काँग्रेसचे श्रेष्ठी कर्नाटकच्या निवडणुकीसाठी उमेदवार निवड प्रक्रियेत व्यस्त असल्याने गोव्यात नवा प्रदेशाध्यक्ष मिळण्यास विलंब लागला आहे. पक्षाचे गोवा प्रभारी चेल्लाकुमार यांनी जास्तीत जास्त येत्या पंधरा ते वीस दिवसात नवा प्रदेशाध्यक्ष जाहीर होईल, असे या प्रतिनिधीला सांगितले. काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी हे कर्नाटकच्या निवडणुकीत उमेदवार निवडण्याच्या कामात व्यस्त आहेत तसेच पुढील दोन दिवसही ते उपलब्ध असणार नाहीत. आपण अद्याप कोणाचीही नावे त्यांना सादर केलेली नसल्याचे चेल्लाकुमार म्हणाले.
प्रदेशाध्यक्षपदासाठी माजी मुख्यमंत्री तथा मडगांवचे आमदार दिगंबर व पक्षाचे राष्ट्रीय सचिव गिरीश चोडणकर यांच्या नावांची चर्चा आहे. प्रारंभी कामत यांच्या बाजूने राहिलेले काही आमदार आता गिरीशसोबत आहेत. या आमदारांनी सुरवातीला गिरीश यांना विरोध केला होता. चेल्लाकुमार यांनी मध्यंतरी दोन दिवसांचा गोवा दौरा करुन पक्षाचे स्थानिक आमदार, प्रदेश समितीचे पदाधिकारी, कार्यकारिणी सदस्य तसेच काही प्रमुख कार्यकर्त्यांशी याबाबतीत चर्चा केली होती. मात्र अजून त्यांनी राहुल गांधी यांना अहवाल सादर केलेला नाही. श्रेष्ठींना नावे प्राप्त झाल्यानंतरच प्रदेशाध्यक्ष निवडीला गती येईल. अध्यक्षाचे नाव जाहीर करण्याआधी श्रेष्ठी पक्षाचे येथील ज्येष्ठ नेते प्रतापसिंह राणे, विधिमंडळ नेते बाबू कवळेकर, रवी नाईक आदींशी सल्लामसलत करण्याची शक्यता आहे.
शांताराम नाईक यांनी तरुण रक्ताला वाव मिळावा म्हणून प्रदेशाध्यक्षपदाची खुर्ची रिकामी केली. या पदावर आता कोणाची निवड होत याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. दरम्यान, आमदार रेजिनाल्द हे गेले दोन दिवस दिल्लीत तळ ठोकून असल्याची माहिती मिळते. काही नेत्यांची त्यांनी भेट घेतल्याचीही चर्चा आहे.