वास्को: गोव्याच्या मुरगाव बंदरात हाताळण्यात येणा-या कोळशामुळे काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून येत असतानाच आता मुरगाव बंदरात उतरविण्यात आलेल्या लाकडी चिप्सच्या भुशामुळे प्रदूषण वाढत असल्याचे मुरगाव तसेच वास्को मतदारसंघात दिसून आले आहे. गुरुवारी (दि.१४) संध्याकाळी वास्कोतील खारीवाडा समुद्रातून मोठ्या प्रमाणात लाकडी चिप्स वाहून आल्याचे दिसून आल्याने समुद्राच्या पाण्यातही प्रदूषण होत असल्याकारणाने ह्या भागात राहणा-या मासेमारी कुटुंबीयातही मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त करण्यात येत असून लाकडी चिप्स माल हाताळणी बंद करा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.मुरगाव तालुक्यात असलेल्या मुरगाव, वास्को इत्यादी मतदारसंघात राहणा-या नागरिकांना मागच्या अनेक वर्षापासून कोळसा प्रदूषणाचा मोठ्या प्रमाणात त्रास होत असल्याचे दिसून आले आहे. सदर कोळसा प्रदूषणाच्या विरुद्ध मुरगाव तालुक्यातील शेकडो नागरिकांनी यापूर्वी अनेक वेळा आंदोलने सुद्धा छेडली आहेत. मागच्या काही महिन्यांपासून येथे होणारे कोळसा प्रदूषण ब-याच प्रमाणात कमी झाल्याचे दिसून आले होते, मात्र गेल्या आठवड्यातून पुन्हा येथे कोळसा प्रदूषणात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने नागरिकात याबाबत तीव्र संताप व्यक्त करण्यात येत असल्याचे दिसून आले. विविध सोशल मिडीयावर शेकडो लोकांनी होणा-या कोळसा प्रदूषणांची विविध चित्र गेल्या आठवड्याभरात घालण्यास सुरू करून याबाबत गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळ का गप्प बसले आहे, असा सवालही उपस्थित केला होता. वास्को व मुरगाव मतदारसंघात वाढत असलेल्या कोळसा प्रदूषणाबाबत नागरिकांनी तीव्र विरोध करण्यास सुरुवात केल्यानंतर गोवा प्रदूषण नियंत्रण महामंडळाने याबाबत दखल घेत मुरगाव बंदरात कोळसा हाताळणा-या कंपनींना २१ फेब्रुवारीपर्यंत कोळसा हाताळणी बंद ठेवण्याबाबत आदेश जारी केला असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी उपलब्ध केली आहे.कोळशाच्या प्रदूषणामुळे वास्को तसेच मुरगाव मतदारसंघातील नागरिक नाराज असतानाच गुरुवारपासून लाकडी चिप्सच्या भुशामुळे प्रदूषण होत असल्याचे दिसून आल्याने पुन्हा एकदा ह्या प्रकाराबाबत नागरिकांत नाराजगीचे वातावरण निर्माण होत असल्याचे दिसून आले. सदर माल हाताळणारी कंपनी लाकडी चिप्सचा साठा बंद करून ठेवत नसल्याने मोठ्या प्रमाणात लाकडी चिप्स समुद्रात पडून त्या खारीवाडा किना-यावर वाहून आल्याचे दिसून आल्याने ह्या भागात राहणा-या मासेमा-यांनी तसेच नागरिकांनी याबाबत तीव्र संताप व्यक्त केला. अशा प्रकारे समुद्राच्या पाण्यात प्रदूषण होत असल्याने याचा समुद्रातील जनजीवनावर वाईट परिणाम होण्याची भीती ह्या भागात राहणारे पारंपरिक मासेमारी व्यवसाय करणारे किस्तोदियो डी’सोझा यांनी व्यक्त करून सदर प्रकरणात कारवाई करण्याची गरज असल्याची मागणी त्यांनी केली.लाकडी चिप्सचा भुसा वा-याने मोठ्या प्रमाणात हवेत मिसळून सध्या येथे हवेतही प्रदूषण होत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून करण्यात येत असून यामुळे कोणाला आजाराच्या सामोरे जावे लागल्यास याला कोण जबाबदार असा सवाल लोकांनी उपस्थित केला आहे. मुरगाव बंदरात हाताळण्यात येणाºया लाकडी चिप्समुळे होणारे प्रदुषण रोखण्यासाठी अचुक पावले उचला अन्यथा ह्या मालाची हाताळणी बंद करा अशी मागणी मुरगाव तसेच वास्कोतील नागरीकांकडून करण्यात येत आहे.
कोळशानंतर आता लाकडी चिप्समुळे होणाऱ्या प्रदूषणामुळे मुरगाव व वास्कोतील नागरिक नाराज
By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2019 7:23 PM