ऑनलाइन लोकमतपणजी, दि. १६ : हवामानात झालेल्या अनपेक्षित बदलामुळे चार दिवस पावसाळी वातावरण राहणार आहे. राज्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. किनारपट्टीलगत द्रोणिका निर्माण झाल्यामुळे या पावसाच्या सरी कोसळत आहेत.
केरळ ते गोवा किनारपट्टीभागात द्रोणिका निर्माण झाल्याची माहिती हवामान खात्याचे पणजी केंद्राचे संचालक एम एल साहू यांनी दिली. या द्रोणिकेमुळे ढगाळ हवामान बनत आहे. ढगाळ हवामानामुळे सूर्याची किरणे थेट जमिनीवर पोहोचत नाहीत. त्यामुळे दिवसा दमट हवामान आणि रात्री गरमी जाणवत आहे. या उष्म्याचा परिणाम होऊन कॉन्वेक्शन प्रक्रिया घडते आणि त्यातून पाऊस पडत आहे. हे वातावरण आमखी चार दिवस राहणार असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे. मंगळवारीही हवेत उष्मा जाणवत होता. नंतर रात्री राज्यात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस पडला होता. असाच पाऊस दोन दिवस पडण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. द्रोणिका म्हणजे काय ?जमनी लगतच्या ठरावीक भागात थंड हवेचा पट्टा निर्माण होण्याच्या क्रियेला द्रोणिका असे म्हणतात. विशेषता किनाऱ्या लगतच्या भागात अधिक प्रमाणात ही द्रोणिका तयार होते. द्रोणिकेला कमी दाबाचा पट्टा असेही म्हणतात द्रोणिका तयार झालेल्या भागात वाऱ्याचे प्रवाह अडविले जातात. तसेच त्या भागात आकाश ढगांनी झाकले जाते.