नारायण गावस, पणजी: राज्यात लाेकसभा निवडणूकीचा निकाल तसेच शाळेचा पहिला दिवस त्यातच सकाळी राज्यभर पावसाने झाेडपल्याने अनेक लोकांची तारांबळ उडाली. मंगळवारी सकाळी पावसाने हजेरी लावली यामुळे शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना कार्यालयात जाणाऱ्या लोकांना मोठी कसरत करावी लागली. जोरदार पावसामुळे सर्वत्र ठिकठिकाणी पावसाचे पाणी भरले होते. याचा अनेक लोकांना त्रास झाला.
राज्य हवामान खात्याने ५ जूनपर्यंत यलोव अलर्ट जारी केला होता. पण गेल्या आठवड्यात तापमानाचा पाराही वाढला हाेता. पण सोमवारी दिवसभरात राज्यात ढगाळ वातावरण होते. तसेच मोठ्या प्रमाणात उष्णताही हाेत होती. पण मंगळवारी सकाळीच पावसाने जाेर धरल्याने लोकांना काही प्रमाणात गारवा मिळाला. सकाळी ८ ते १० पर्यंत राज्यात ठिकठिकाणी पावसाने जोरात हजेरी लावली. यामुळे बहुतांश भागात रस्त्यावर पाणी साचले होत. तर काही लोकांच्या घरात पाणी गेले.
राजधानी पुन्हा चिखलमय -
पणजी राजधानीत गेल्या आठवड्यात अवकाळी पावसाने बुडाली होती. आजही सकाळी झालेल्या जागा पावसाने पणजीतील बहुतांश रस्त्यावर पाणी साचले हाेते. तसेच पणजीत स्मार्ट सिटीची कामे असल्याने ठिकठिकाणी रस्ते खाेदले आहेत. त्यामुळे रस्त्यावर माती साचल्याने अनेक रस्ते चिखलमय झाले होते. रायबंदर तसेच इतर काही चिखल झाल्याने यात काही गाड्याही रुतल्या मळा पणजी पाटो पणजी, १८ जून रस्ता तसेच बसस्थानकावर पावसाचे पाणी साचल्याने वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागला. तसेच बांबोळी येथील अंडरपासमध्ये पाणी साचल्याने दुचाकी चालकांना मोठी कसरत करावी लागली.
विद्यार्थी पालकांना फटका-
शैक्षणिक वर्षे २०२४ २५ आज मंगळवार पासून सुरु झाल्याने पहिल्याच दिवशी सकाळी शाळेत जाताना अनेक विद्यार्थ्यांना पावसाने भिजवले. शाळेचा पहिलाच दिवस असल्याने अनेक पालकही आपल्या मुलांना घेऊन शाळेत गेले होते. यामुळे सकाळी आलेल्या पावसाचा त्यांना फटका बसला. अनेकांनी अजून छत्र्या रेनकोट खरेदी नव्हते. तसेच सकाळपासून निवडणूक निकालाची रणधुमाळी सुरु झाल्याने या पावसाचा येथे उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांनाही फटका बसला.