नारायण गावस -
पणजी : राज्यात मुसळधार पाऊस सुरुच असून शनिवार राजधानी पणजीतील पाटाे येथे पुराचे स्वरुप निर्माण झाले होते. पाटो परिसरातील रस्त्यावर पावसाचे पाणी भरल्याने वाहन चालकांची तारांबळ उडाली. शनिवारी पाऊस कमी असला तरी अचानक आलेल्या भरतीमुळे हे पाणी शिरले. येथील रस्त्यावर गुडघाभर पाणी साचल्याने अनेक लोकांना कार्यालयात जातानाही त्रास सहन करावा लागला.
पणजी पाटो परिसर हा शहरातील इतर भागापेक्षा सुसज्ज इमारतींनी व्यापलेला आहे. मागील काही वर्षापासून येथे माेठ्या इमारती झाल्या आहेत. प्रत्येक वर्षी पावसाळ्यात या भागात पाणी साचत असते. आता स्मार्ट सिटीची कामेही येथे करण्यात आली तरी या वर्षी स्मार्ट सिटीला हे पुराचे पाणी थांबविता आले नाही. येथे सांडपाण्याचे गटार तसेच इतर गटारातील पाणी व्यवस्थित नदीला जाऊन मिळत नसल्याने येथे पूर आला आहे. तसेच येथे मोठे प्रकल्प आल्याने पाणी जायला वाट मिळत नाही.
पाटो परिसरात गुडघाभर साचलेल्या पाण्यामुळे अनेक लोकांचे हाल झाले. वाहनचालकांना वाहने चालविताना मोठा त्रास झाला. पाटो परिसरात मोठी वाहतूक वर्दळ असते. तसेच या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गाड्याही पार्क करुन ठेवल्या जातात. बहुतांश दुचाकी या अर्ध्या पाण्यात गेल्या होत्या. अनेक ठिकाणी चिखलाचे पाणी साचले होते.
स्मार्ट सिटीला अपयश
राजधानी पणजीत पाटाे परिसर, मळा तसेच १८ जून रस्ता, बसस्थानक मार्केट अशा विविध ठिकाणी पावसाचे पाणी साचत असते. येथे स्मार्ट सिटीने सांडपाण्याचे गटार साफ केली आहेत. पण तरीही बहुतांश ठिकाणी पूर येत असतो. अनेक ठिकाणी गटारात प्लास्टिक तसेच इतर कचरा साचून राहत असल्याने हा पूर येत आहे. सतत पाऊस झाल्याने पणजीत पाणी साचत असते. करोडा रुपये खर्च करुनही या समस्या सोडायला स्मार्ट सिटीला अपयश आले आहे.
साेेशल मिडीयावर तीव्र प्रतिक्रिया
पाटो पणजी परिसरात पणजी महानगर पालिका मोठ्या प्रमाणात पे पार्किग शुल्क आकारले जाते. पण येथे पुराचे पाणी भरु नये यासाठी महानगर पालिकेने काहीच केेलेले नाही. पाणी व्यावस्थित नदीला मिळणार का नाही याचे कुठलेच नियाेजन करता. येथे माेठ्या इमारती बांधल्या त्याचा परिणाम आता लोकांना सहन करावा लागत आहे. या चिखलाच्या पाण्यामुळे आता राेगराई पसरण्याची भिती आहे अशा तिव्र प्रतिक्रिया साशल मिडीयावर येऊ लागल्या आहेत.