पणजी : राज्य विक्रीकर खात्याने १० हजार रुपयांपेक्षा कमी कर थकबाकी असलेले डीलर्स, व्यापाऱ्यांची ४८.५ कोटी रुपयांची थकबाकी माफ केली आहे. १६,४१२ जणांना याचा लाभ झाला. कराची थकबाकी असलेले व्यापारी ७ मार्चपर्यंत अर्ज करू शकतात, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
मुख्यमंत्री म्हणाले की, 'कर थकबाकी राहिलेली नसल्याचे प्रमाणपत्र विक्रीकर खात्याच्या वेबसाईटवरून घेता येईल. १० हजार रुपयांपेक्षा कमी रकमेची कर थकबाकी असलेल्या व्यापाऱ्यांना अधिनियमांतर्गत करमाफी देण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. तशी घोषणा मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी विधानसभेतही केली होती.
मुख्यमंत्री यावेळी बोलताना म्हणाले की, २०१६ पासून हा विषय प्रलंबित होता. ८ ऑक्टोबर २०२३ रोजी आम्ही ओटीएस जाहीर केली त्याची मुदत येत्या ७ मार्च रोजी संपत आहे. त्यानंतर अर्ज स्वीकारले जाणार नाहीत आणि करमाफीची कोणतीही सवलत दिली जाणार नाही. गोवा सरकारची अत्यंत चांगली योजना असून अन्य कोणत्याही राज्यांमध्ये अशी करमाफी दिलेली नाही. विक्रीकर किंवा जीएसटी खात्याच्या तालुका कार्यालयांमध्ये डीलर्सना या योजनेचा लाभ घेण्यासाठी अधिकारी सहकार्य करतील तसेच उर्वरित मुदतीत ऑनलाइन अर्ज करून या योजनेचा लाभ घेता येईल.'